नाशिक : नामांकित कंपनीच्या अनधिकृत खतसाठाप्रकरणी आलेल्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कळवण तालुक्यातील निवाणे या गावी छापा टाकून दोन कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. तसेच २० टन खतांचा साठा अनधिकृत आढळून आल्याने तो जप्त करण्यात आला. या खतांची किंमत सुमारे तीन लाख इतकी आहे.जिल्हा कृषी विकास अधिकारी हेमंत काळे यांना कळवण तालुक्यातील निवाणे येथे नामांकित कंपन्यांच्या अनधिकृत साठ्याप्रकरणी तक्रार आली. त्यानुसार हेमंत काळे यांनी जिल्हा कृषी अधिकारी अभिजित जमदाडे यांना जाऊन संबंधित ठिकाणी पाहणी व तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अभिजित जमदाडे व कळवण कृषी अधिकारी राहुल अहिरे यांनी निवाणे गावी जाऊन मे. योगेश्वर कृषी सेवा केंद्र व मे. आशापुरी कृषी सेवा केंद्र येथे छापा टाकून दोन्ही दुकानांचे नमुने घेतले. त्यात योगेश्वर कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीत तेथे २० टन खतसाठा अनधिकृत असल्याचे आढळून आल्याने तो जप्त करण्यात आला. या जप्त केलेल्या खतांची किंमत सुमारे तीन लाख रुपये इतकी आहे. तपासणीसाठी घेतलेले नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी अधिकृत खत व बियाणे विक्रेत्यांकडूनच खतांची खरेदी करावी, तसेच त्यापोटी पावती घ्यावी, तसेच काही गैरप्रकार असल्याचे आढळल्यास तत्काळ जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
निवाणेत तीन लाखांची खते जप्त
By admin | Updated: July 28, 2016 00:22 IST