नाशिक : अज्ञात संशयितांनी बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवून शरणपूररोडवरील विविध राष्ट्रीय स्तरावरील विविध बॅँकांमध्ये सुमारे तीन लाख सात हजार रुपयांच्या बनावट रकमेचा भरणा केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१५ पासून २०१६च्या डिसेंबर अखेरपर्यंत विविध बॅँकांमध्ये अज्ञात संशयितांनी बनावट नोटा भरल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी सर्व बॅँकांमध्ये जाऊन बनावट नोटा जप्त केल्या असून, संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरणपूररोडवरील आयसीआयसीआय, बॅँक आॅफ बडोदा, येस, कॉसमॉस या बॅँकांमध्ये बनावट नोटांचा भरणा केल्याचे उघडकीस आले आहे.५० रुपयांच्या दोन, शंभराच्या १३५, पाचशेच्या २६१ व एक हजारांच्या १६३ बनावट नोटा असे एकूण तीन लाख सात हजार रुपयांचा भरणा केला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, अधिक तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)
विविध बॅँकांमध्ये तीन लाखांच्या बनावट नोटा
By admin | Updated: January 6, 2017 00:49 IST