कोकणगाव फाट्यावर अपघातात तीन ठारमुंबई-आग्रा महामार्ग : पिकअपला बसची जोरदार धडकओझर टाऊनशिप : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाट्यावर पिकअपला एसटी बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ११ वर्षाच्या मुलासह तीन जण ठार झाले, तर इतर तीन जण जखमी झाले आहेत. निफाड तालुक्यातील दात्याने येथील शेतकरी रविवारी पहाटेच्या सुमारास पिंपळगाव बाजार समितीतून टमाटा विकून परत येत होते. यावेळी त्यांच्या पिकअपला नाशिकहून नंदुरबारकडे जाणाऱ्या नंदुरबार आगाराच्या बसने जोरदार धडक दिली. या अपघातात पिकअपमधून परतणाऱ्या दात्याने येथील बाळू धनवटे (४५), रावसाहेब पवार (४२), संकेत बोरसे (११) यांचा जागीच मृत्यू झाला तर पिकअपचालक संतोष बोरसे (३९), ज्ञानेश्वर शिंगाडे (३२) व बसमधील संदीप अमृतकर (४६) पिंपळनेर गंभीर जखमी झाले असून, त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पिंपळगाव पोलिसांनी नितीन शिरसाठ (३४) या बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक एस. एस. साळुंखे यांच्यासह पिंपळगाव पोलीस अपघाताचा अधिक तपास करीत आहे. (वार्ताहर) दात्याणे गावावर शोककळा
कसबे सुकेणे : मुंबई - आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाट्यावर रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात निफाड तालुक्यातील दात्याणे येथील तीन जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, गणेश विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या दुर्घटनेमुळे ओझर ते सुकेणेदरम्यानचा संपूर्ण बाणगंगा काठ हळहळला आहे. टमाटा विकून दात्याणे गावाकडे परतणाऱ्या या शेतकऱ्यांवर रविवारी रात्री काळाने घाला घातला. दोन हरहन्नरी तरूण प्रगतिशील शेतकरी तर बारावर्षीय मुलाचा या अपघातात मृत्यू झाल्याने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. दात्याणे ग्रामपंचायतीचे सदस्य असलेले नरेंद्र ऊर्फ बाळासाहेब पंढरीनाथ धनवटे (४५) 1यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, तर रावसाहेब मुरलीधर पवार (४५) यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. तर बारा वर्षीय संकेत संतोष बोरसे हा दात्याणे गावातील नाभिक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तू तुपे यांचा एकुलता एक नातू आहे. एकाच गावातील तीन जणांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले असून, शेतकरी कुटुंबातील कर्ते पुरूष काळाच्या पडद्याआड झाल्याने पवार व धनवटे कुटुंब पोरके झाले आहे. दात्याणे येथील अमरधाममध्ये या तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दात्याणे, जिव्हाळे व परिसरातील गावांनी व्यवहार बंद ठेवून या तिघांना श्रद्धांजली वाहिली.