नाशिक : नाशिकरोड विभागात जुने पथदीप काढून ते विविध ठिकाणी बसविण्याच्या कामात झालेली अनियमितता आणि मक्तेदाराशी संगनमत करतानाच वरिष्ठांची दिशाभूल करणाऱ्या महापालिकेच्या विद्युत विभागातील एका उपअभियंत्याबरोबरच दोन कनिष्ठ अभियंत्यांना आयुक्तांनी निलंबित केले आहे. बिटको रुग्णालयातील सीसीटीव्ही खरेदीप्रकरणीही उपअभियंत्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. विद्युत विभागातील उपअभियंता वसंत गोपाळराव लाडे, कनिष्ठ अभियंता कृष्णा बाबूराव जगदाळे आणि मोहन विजयराव गिते या तीन अभियंत्यांवर प्रशासनाने निलंबनाची कारवाई करत त्यांची विभागीय चौकशी लावली आहे. नाशिकरोड विभागातील जेलरोड येथील प्रभाग क्रमांक ३२ मध्ये जुने पथदीप काढून ते विविध ठिकाणी बसविण्यासंबंधी आठ लाख ९२ हजार ८५० रुपये खर्चाचे काम तिलोत्तमा इलेक्ट्रिकल्स अॅण्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या मक्तेदारास देण्यात आले होते. सदर काम २८ मे २०१४ रोजी पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु काम पूर्ण होण्यापूर्वीच कामाच्या नोंदी मोजमाप पुस्तिकेत घेतल्याची बाब सकृतदर्शनी प्रशासनाच्या निदर्शनास आली. सदर बाब अतिशय गंभीर असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. याशिवाय मुदतीत काम पूर्ण न केल्याने मक्तेदारास होणाऱ्या दंडनीय कारवाईतून वाचविण्यासाठी संगमनत करण्यात आले आणि त्याला पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. सदर प्रमाणपत्रावर दिनांक तसेच मोजमाप पुस्तिकेवर तपासणी अधिकाऱ्याची स्वाक्षरीही दिनांकीत नसल्याचे निदर्शनास आले. याचबरोबर वरिष्ठांची दिशाभूल करून बिल लेखा विभागाकडे सादर करण्यात आले. प्रभाग ३४ मधील आठ लाख ९८ हजार ९७० रुपयांच्या कामातही अनियमितता आढळून आली. या बाबींची आयुक्तांनी गंभीर दखल घेत तिघा अभियंत्यांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश काढले आणि तिघांचीही विभागीय चौकशी लावली आहे. आयुक्तांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आणखीही काही अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता बोलून दाखविली जात असल्याने अधिकारी वर्गाने धास्ती घेतली आहे. (प्रतिनिधी)