मालेगाव : तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने वीज पडून शेळीसह सात जनावरांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात गारपीट व विजांसह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांबरोबरच फळबागांचे मोठे नुकसान केले. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना काही ठिकाणी पशुधनालाही मुकावे लागले. तालुक्यात दि. ११ ते १५ मार्चदरम्यान काही ठिकाणी गारपीट व विजांसह पाऊस झाला. वीज पडल्यामुळे अस्ताणे, वळवाडी, अजंग, लखाणे या गावात पाच जनावरे मृत्युमुखी पडले, तर चिंचगव्हाण येथे भावसिंग मांडवडे यांच्या पाचटाच्या झोपडीचे नुकसान झाले.यात अजंगच्या गिरीश पवार यांचे दोन बैल, वळवाडी येथील आप्पाजी पाटील व लखाणे येथील कैलास पगार या दोघांचा प्रत्येकी एक बैल, तर अस्ताणचे गंगाधर देवरे यांचा गोऱ्हा. १५ मार्च रोजी पडलेल्या पावसात उंबरदे येथे एक बैल व कंक्राळे येथे भिंत कोसळल्याने शेळीचा मृत्यू झाला.पावसाने पिकांचे नुकसान केले. महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार १५ मार्च रोजी कोठरे, दुंधे, तळवाडे, रावळगाव आदि भागात झालेल्या पाऊसाने कांदा, भाजीपाला याबरोबरच डाळींबबागांचे नुकसान झाले. त्यात दुधे येथील १२५ हेक्टर कांदा, ६५ हेक्टर डाळींब, ६ हेक्टर भाजीपाला, तळवाडे येथील २५० हेक्टर कांदा, १८० हेक्टर डाळींब, १० हेक्टर भाजीपाला, पांढरुण ५५ हेक्टर कांदा, १२५ हेक्टर डाळींब, रावळगाव कांदा व डाळिंबाचे प्रत्येकी ५० हेक्टर, तर कोठरे बु।। १५५ हेक्टर कांदा, ६२ हेक्टर गहू, १२ हेक्टर मका, प्रत्येकी ५ हेक्टर हरबरा व कांदा बी तसेच कोठरे खु।। हेक्टर कांदा, ८० हेक्टर गहू, १० हेक्टर मका, ४ हेक्टर हरबरा व २ हेक्टर कांदा बी या पावसाने बाधित झाले आहे. तहसील व कृषी विभागाकडून या पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)
मालेगावी हजारो हेक्टरचे नुकसान
By admin | Updated: March 20, 2015 23:01 IST