पंचवटी : परिसरातील मालेगाव स्टॅण्ड, जाजूवाडी तसेच त्यानंतर पेठरोडवरील दत्तनगर भागात झालेल्या घरफोड्यांचे कोणतेही धागेदोरे पंचवटी पोलिसांच्या हाती लागलेले नसून संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना कसोटी करावी लागणार आहे. दिवसा तसेच रात्रीच्या वेळी घडलेल्या या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज तसेच रोकड चोरून नेली आहे. या घटनेला जवळपास आठवडा लोटला आहे, तर मालेगाव स्टॅण्ड येथे झालेल्या व्यापाऱ्याच्या दुकानातील चोरीला महिना झाला आहे; मात्र अद्याप तपास शून्य आहे. मालेगाव स्टॅण्ड परिसरात ज्या दुकानात घरफोडी झाली होती त्याच भागातून एक चारचाकी गाडी चोरीस गेली होती. ही गाडी सापडवण्यात पोलिसांना यश आले; मात्र त्याव्यतिरिक्त पोलिसांच्या हाती चोरटेही लागले नाहीत आणि संशयितही मिळालेले नाहीत. जाजूवाडीत भरसकाळी घरात घुसून दागिने चोरी गेले होते, तर पेठरोडवरील फुलेनगर पोलीस चौकीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या दत्तनगर येथील ईशकृपा बंगल्याच्या खोलीचे गज कापून चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिने तसेच रोकड चोरून नेल्याची घटना घडली होती; मात्र या घरफोडीचेही पोलिसांना कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत, तर पोलीस केवळ तपास सुरू असल्याचे सांगत आहेत. भरदिवसा व रात्रीच्या वेळी घरफोड्या घडत असतानाही पोलिसांना संशयितांना जेरबंद करण्यास अपयश येत असल्याने पंचवटी पोलिसांना मरगळ आल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)
पंचवटीतील त्या घरफोड्यांचे अद्याप धागेदारे नाहीत
By admin | Updated: November 6, 2014 00:18 IST