सिन्नर : तालुक्यातील पास्ते येथील शिवनदीवरील पूल मोडकळीस आला असून, जुना पूल तोडून त्याठिकाणी नवीन पूल बांधण्याची मागणी पास्तेचे माजी सरपंच जयंत आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.पास्ते येथील ग्रामपंचायत कार्यालयाशेजारून शिव नदी वाहते. या नदीवरील पूल अत्यंत जुना झाला असून, मोडकळीस आला आहे. या पुलावरून गेल्या महिन्यात पुराच्या पाण्यात एक आदिवासी युवक वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. पास्ते गावात जाणाऱ्या-येणाऱ्या सर्व वाहनांना याच पुलावरून जावे लागते. सदर पूल ६० ते ७० वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. या पुलाचे बांधकाम अतिशय जीर्ण झाल्याचे आव्हाड यांनी निवेदनात म्हटले आहे. पुलाचे बांधकाम जीर्ण झाल्याने तो पूल कधीही तुटू शकतो व त्यामुळे जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाल्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. सदर पूल तुटल्यास पास्ते गावचा इतर गावांशी असलेला संपर्क तुटू शकतो. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी असलेला शिवनदीवरील पूल नव्याने बांधण्यात यावा, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाम मंत्री, मुख्य सचिव, महसूल आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)
शिवनदीवरील जीर्ण पूल मोडकळीस
By admin | Updated: August 26, 2016 22:02 IST