नाशिक : जातपंचायतीच्या जाचामुळे परभणीतील दाम्पत्याला स्वत:चे गाव सोडून नाशकात आसरा घेण्याची वेळ आली आहे. या दाम्पत्याला अद्यापही जातपंचायतीच्या धमक्या येत असून, हे दाम्पत्य पोलिसांत तक्रार करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, या प्रकरणाबरोबरच परभणीतील गोंधळी समाजाच्या जातपंचायतीने नाशिकमधील आणखी तीस कुटुंबे वाळीत टाकल्याची धक्कादायक बाबही उघड झाली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी हा प्रकार उजेडात आणला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील सेलू येथे राहणारे दीपक मोरे व त्यांची पत्नी सोनी मोरे यांनी आपल्या गोंधळी समाजाच्या पंचांकडून भिशीच्या स्वरूपात ८० ते ९० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याची परतफेड करताना या दाम्पत्याने मूळ रकमेच्या तीनपट व्याज भरले, प्रत्येक वसुलीच्या वेळी पंचांना दारू-मटणाचा पाहुणचारही केला. तरी मुद्दल रक्कम ‘जैसे थे’ होती. पंचांकडून त्यांच्याकडे सहा ते सात लाख रुपयांची मागणी केली जात होती. दोन वर्षांपूर्वी पंचांनी घरात घुसून सोनी मोरे यांच्याशी असभ्य वर्तन केले, धमक्या दिल्या, त्यांच्या घराच्या दरवाजावर त्यांना बहिष्कृत केल्याची खूण म्हणून चप्पल बांधली. घरातील संसारोपयोगी वस्तू, घराचे पत्रे काढून नेले. या प्रकाराला घाबरून या दाम्पत्याने गावातून पळ काढत नाशिक गाठले व नातेवाईक सुभाष उगले यांच्याकडे आसरा घेतला; मात्र पंचांनी उगले यांनाही धमक्या दिल्या. त्यांना परभणीहून ‘वाळपत्र’ पाठवून समाजातून बहिष्कृत करण्यात आले. त्यामुळे उगले व मोरे आता पोलिसांत जाण्याच्या तयारीत आहेत. सध्या दीपक मोरे हे नाशिकमध्ये गटार स्वच्छता, तर त्यांची पत्नी जुने कपडे विकून उपजीविका करीत आहे. दरम्यान, परभणीच्या जातपंचायतीने विविध कारणांवरून बहिष्कृत केलेली शहरात तीस कुटुंबे असून, त्यांना समाजातील विवाह, मृत्यू या गोष्टींपासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप या कुटुंबांनी केला आहे. (प्रतिनिधी)
नाशिकमधील तीस कुटुंबे वाळीत
By admin | Updated: January 18, 2016 23:22 IST