नाशिक : भाजीपाला आणि फळे नियमनमुक्तीचा निर्णय घेतल्याने त्याविरोधात पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय लाक्षणिक बंदमुळे जिल्ह्यातील १९ बाजार समित्यांचे सुमारे ३०० ते ३५० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. एकट्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची ४० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचे बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी दिली.दरम्यान, बाजार समित्या बंद असल्यामुळे सोमवारी (दि.४) बाजारात आलेल्या शेतमाल व भाजीपाला व्यापाऱ्यांनी कवडीमोल भावात विकल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर बाजार समितीत काम करणाऱ्या माथाडी कामगार व रोजंंदारीवरील कर्मचाऱ्यांची उपासमार झाल्याचे चित्र होते.राज्य शासनाने नुकताच भाजीपाला व फळे नियमनमुक्तीच्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. त्याविरोधात राज्यातील सर्व बाजार समित्यांनी सोमवारी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी जिल्ह्यातील १९ बाजार समित्या व उपबाजार यांच्यातील व्यवहार ठप्प झाले. नाशिक जिल्ह्यास लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांदा, तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीस येत असतो. एकट्या नाशिक बाजार समितीत दररोज किमान एक हजार वाहने दिवसभरात टमाटे, फ्लॉवर, कोथिंबीर, कोबी, सीमला मिरची यांसह विविध भाजीपाला विक्रीसाठी येत असतो. सोमवारी लाक्षणिक बंद असल्याने बाजार समितीत शुकशुकाट जाणवत होता. किरकोळ स्वरूपात काही शेतकऱ्यांनी कारले विक्रीसाठी आणले होते. कारल्याचे २० किलो जाळीस १००० ते १२०० भाव असताना सोमवार बंदच्या काळात याच कारल्यांच्या जाळीचा भाव २५० ते ३०० रुपयांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे बाजार समिती बंद राहिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांतील दररोजचे व्यवहार पाहता किमान ३०० ते ३५० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
नाशिक बाजार समितीत ४० कोटींचे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 00:13 IST