सिन्नर : शहर व परिसरातील शाळांमध्ये अचानक महानायक अर्थात ‘बीग बी’ अमिताभ बच्चन प्रकटतात तेव्हा विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा डोळ्यावर विश्वास बसत नाही. ज्युनिअर अमिताभ बच्चनसोबत गप्पा मारण्यासह विद्यार्थी नाचगाण्यात दंग होऊन गेल्याचे चित्र अनेक शाळांमध्ये दिसून आले. निमित्त होते ‘लोकमत’ च्या वतीने आयोजित ‘भूतनाथ तुमच्या भेटीला’ या उपक्रमाचे. लोकमतने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या या उपक्रमाचे शहरातील शाळांमध्ये टाळ्यांचा कडकडाटात स्वागत करण्यात आले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही या ज्युनिअर अमिताभसोबत थिरकण्याची हौस पूर्ण करून घेत ‘लोकमत’चे आभार मानले. सिन्नर येथे लोकमत सखी मंच व बालविकास मंचाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यक्रम येथील सार्वजनिक वाचनालयात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते श्री गणेश व स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत, सिन्नर बाजार समितीचे सभापती कचरू डावखर, पंचायत समिती सदस्य राजेंद्र घुमरे, रामदास खुळे, विजय काटे, तहसीलदार सुनील सौंदाणे, नगरसेवक संजय नवसे, काशीनाथ सानप आदिंसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे ‘लोकमत’च्या वतीने स्वागत करण्यात आले. लोकमतच्या वतीने सखी मंच व बालविकास मंचाच्या सभासदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी कौतुक केले.ज्युनिअर अमिताभ यांनी सखी मंच व बालविकास मंच यांच्या सदस्यांसाठी विविध गेम शो, उखाणे स्पर्धा, कौन बनेगा करोडपती प्रश्नमंजुषा, वेगवेगळ्या गीतांवर नृत्य सादर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले. त्याचबरोबर संस्काराचे मोती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांनी आवाहन केले. कृष्णा वावधाने यांनी सूत्रसंचालन केले. प्रारंभी विद्यार्थी व शिक्षकांना अमिताभ बच्चनला पाहून चक्क खरे अमिताभ आले की काय, असे वाटू लागले. मात्र ते ज्युनियर अमिताभ असल्याचा खुलासा केल्यावर सर्वांच्या नजरेत आश्चर्याचा भाव चमकून गेला. प्रारंभी येथील चांडक कन्या विद्यालयात कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम सादर केला. डॉ. स्वाती टोकेकर यांनी शाळेच्या वतीने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात मुख्याध्यापक एस. एस. खैरनार यांच्याहस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. टाळ्यांचा कडकडाट व विविध उदाहरणांसह संस्कारक्षम जीवन जगण्यासाठी संस्काराच्या मोती स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. येथील नवजीवन डे स्कूलमध्ये मुख्याध्यापक बी. बी. पाटील यांनी स्वागत केले. एस. जी. पब्लिक स्कूलमध्ये संस्थेचे संचालक अण्णासाहेब गडाख, राजेश गडाख यांच्या हस्ते ज्युनियर अमिताभ यांचा सत्कार केला. यावेळी व्यासपीठावर सचिव दौलतराव मोगल, मुख्याध्यापक आर. बी. एरंडे, मुख्याध्यापक यू. सी. कुदळे आदि उपस्थित होते. ब. ना. सारडा विद्यालयात प्र. ल. ठोके यांनी स्वागत केले. शहरातील सर्व विद्यालयांत कौन बनेगा करोडपती प्रश्नमंजूषा, विविध गीतांवरील नृत्य व हरिवंशराय बच्चन यांच्या कविता सादर केल्या. तसेच विद्यार्थ्यांना त्यांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नये, खोटे बोलू नये व आई-वडिलांना कधीही विसराचे नाही याबाबत शपथ दिली. तसेच चांगल्या वर्तनुकीतून चांगला नागरिक घडावा, असा संदेश देतानाच संस्काराचे मोती स्पर्धेतून जीवनात मिळणारे ज्ञान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
बिग बी’सोबत थिरकले चिमुकले
By admin | Updated: July 17, 2014 00:28 IST