नाशिक : शिक्षणातून वैचारिक प्रबोधन घडणे महत्त्वाचे असून, शिक्षणातून चांगला माणूस निर्माण होईल, अशी शिक्षणव्यवस्था निर्माण होणे आवश्यक असल्याचे मत जयवंत ठाकरे यांनी सोमवारी (दि. २०) हुतात्मा स्मारक येथे आयोजित डॉ. नरेंद्र दाभोलकर व्याख्यानमालेत व्यक्त केले. ‘शिक्षणाची आजची स्थिती आणि अपेक्षित बदल’ या विषयावर ठाकरे यांनी या व्याख्यानमालेचे ३८वे पुष्प गुंफले. यावेळी ठाकरे यांनी पाठांतर करून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे धंदेवाईक नागरिक घडत असल्याने जबाबदार पिढी घडण्याकडे शिक्षणाचा कल असावा, असे स्पष्ट मत ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. शिक्षणाचा मूळ गाभा माणसात असावा, असे सांगताना ठाकरे यांनी माणूस घडवणं ही शिक्षणाची महती असल्याचे अधोरेखित केले. शिक्षक आणि विद्यार्थी ज्ञान परायण असावे तसेच सेवाभाव निर्माण करणारे शिक्षण कुचकामी ठरत असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक नागरिकांचे शिक्षण सर्वसमावेशक असावे यासाठी शिक्षण क्षेत्रात प्रयत्न व्हायला हवेत याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले. समाजवादी अध्यापक सभा यांच्यातर्फे आयोजित या व्याख्यानाचे सोमवारी ३८वे पुष्प गुंफण्यात आले. यावेळी अलका एकबोटे यांनी अध्यापक सभेच्या कार्याची माहिती सांगितली. २० फेब्रुवारी हा गोविंद पानसरे यांचा स्मृतीदिन असल्याने व्याख्यानाच्या सुरुवातीला कॉमे्रड गोविंद पानसरे यांना आदरांजली वाहण्यात आली. वसंत राऊत यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर रामदास भांड यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर वसंत एकबोटे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर, राम गायटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जबाबदार पिढी घडण्याकडे शिक्षणाचा कल असावा
By admin | Updated: February 22, 2017 23:14 IST