नाशिक : महापालिका निवडणुकीत ३१ पैकी दोन प्रभागांमधील तीन प्रवर्गांमध्ये केवळ दोनच उमेदवार आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे हे तीनही प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित असून, सेना-भाजपातच थेट लढत रंगणार आहे. अन्य राजकीय पक्षांना याठिकाणी एकही उमेदवार देता आलेला नाही आणि अपक्षांनीही पाठ फिरविली. दरम्यान, सात प्रभागांमध्ये तिरंगी सामना रंगणार आहे. महापालिका निवडणुकीत एका प्रभागात उमेदवारांची संख्या किती यावर तेथील उमेदवारांबाबत विजयाचे आडाखे बांधले जातात. यंदा एका प्रवर्गात तब्बल १४ पर्यंत उमेदवारांची संख्या जाऊन पोहोचली आहे. मात्र, दोन प्रभागांमधील तीन प्रवर्गात थेट सरळ सामना रंगणार आहे. प्रभाग ७ मध्ये सर्वसाधारण महिला गटात भाजपाच्या स्वाती राजीव भामरे यांच्याविरुद्ध सेनेच्या संगीता राजेंद्र देसाई अशी लढत आहे. स्वाती भामरे या भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात, तर सेनेच्या संगीता देसाई या शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या पॅनलमध्ये असल्याने बोरस्ते यांच्या दृष्टीने ही लढत प्रतिष्ठेची आहे. या प्रभागात तीनच अर्ज दाखल झाले होते. परंतु एकाने माघार घेतल्याने दुरंगी सामना होत आहे. प्रभाग क्रमांक २० मध्येही दोन प्रवर्गांमध्ये दुरंगी लढत होत आहे. त्यात नागरिकांचा मागासवर्ग महिला गटात शिवसेनेकडून सुनीता श्रीराम गायकवाड, तर भाजपाकडून सीमा राजेंद्र ताजणे लढत देत आहेत. याठिकाणीही तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने दोनच उमेदवार रिंगणात उरले आहेत. प्रभाग २० मध्येच सर्वसाधारण महिला गटात मनसेतून भाजपात दाखल झालेल्या नगरसेवक संगीता हेमंत गायकवाड यांचा सामना सेनेच्या योग१ता किरण गायकवाड यांच्याशी होत आहे. या गटातूनही दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने दुरंगी लढत होत आहे. विशेष म्हणजे दुरंगी लढत होत असलेले हे तीनही गट महिलांसाठी आरक्षित आहेत. (प्रतिनिधी)सात प्रभागांत तिरंगी लढतसात प्रभागांमध्ये तिरंगी लढत होत आहे. त्यात प्रभाग ५ मध्ये भाजपाच्या चंद्रकला धुमाळ, अपक्ष विमल पाटील आणि सेनेच्या संजीवनी वराडे, प्रभाग ६ मध्ये भाजपाचे पुंडलिक खोडे, मनसेच्या चित्रा तांदळे, सेनेचे परशराम वाघेरे, प्रभाग ७ मध्ये सेनेचे अजय बोरस्ते, मनसेचे सत्यम खंडाळे व भाजपाचे नरेंद्र पवार, प्रभाग ९ मध्ये सेनेच्या ज्योती काळे, भाजपाच्या हेमलता कांडेकर, अपक्ष सुवर्णा मंडळ, प्रभाग २५ मध्ये सेनेच्या हर्षा बडगुजर, मनसेच्या सावित्री रोजेकर व अपक्ष अर्चना शिंदे, प्रभाग २८ मध्ये सेनेच्या शीतल भामरे, मनसेच्या अनिता दातीर व भाजपाच्या प्रतिभा पवार आणि प्रभाग ३० मध्ये अपक्ष शकुंतला खोडे, भाजपाच्या सुप्रिया खोडे व मनसेच्या पद्मिनी वारे यांच्यात तिरंगी सामना होत आहे.
तीन प्रवर्गांमध्ये दुरंगी लढत
By admin | Updated: February 14, 2017 23:54 IST