नाशिकची बांधकाम नियंत्रण व विकास नियमावली सोशल मीडियावर झळकल्यानंतर उद्भवलेल्या स्थितीवर नाशिकचे प्रसिद्ध वास्तुविशारद अरुण काबरे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना लिहिलेले हे अनावृत्त पत्र...मा. नामदार, गिरीश महाजनजी सप्रेम नमस्कार, नुकतीच प्रसिद्ध झालेली शहर विकास नियंत्रण नियमावली पूर्णत: खोटी असल्याचे प्रतिपादन आपण माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केल्याचे वाचण्यात आले. ही खोटी नियमावली प्रसिद्ध करणाऱ्यांचा शोध घ्यावा व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना आपण पोलीस खात्याला दिली असल्याचेही वृत्त आहे. ऐन निवडणुकीच्या दरम्यान हे घडले म्हणून मतांवर प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी आपण त्वरित अॅक्शन घेतली आहे. त्याबद्दल आपले अभिनंदन! मात्र गेल्या दोन वर्षांचा आपण शहराचा आढावा घेतला असता तर सरकारी धोरणे आणि दुर्लक्षांमुळे बांधकाम क्षेत्र किती अडचणीत आले आहे, त्याची आपणास खात्री पटली असती. शहर विकास आराखड्यातील गोंधळ, प्रचंड प्रमाणात वाढलेले विकास शुल्क, बांधकाम परवानग्या, पूर्णत्वाच्या दाखल्यास दिलेली स्थगिती, कपाटाचा गोंधळ या सर्व कारणांमुळे नाशिकची बांधकामे बंद पडली. कुशल व अकुशल कामगारांवर उपासमारीची वेळ आली. बिल्डर्स आणि डेव्हलपर कर्जबाजारी झाले. आर्किटेक्ट्स आणि इंजिनिअर्सवर बेकारीची वेळ आली. एकूणच नाशिकचा विकास ठप्प झाला. प्रत्येकवेळी सर्व व्यावसायिकांनी लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन सरकारकडे पाठपुरावाही केला. मात्र, केवळ आश्वासनांपलीकडे काहीच मिळाले नाही. नाशिकमधील सर्वच्या सर्र्व लोकप्रतिनिधी सरकार पक्षाचे असून ही परिस्थिती उद्भवली आहे. नाशिक शहरावर सततचा अन्याय होत आला आहे. त्यामुळे आम्ही व्यावसायिक सरकारी कार्यपद्धतीवर नाराज आहोत. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली नियमावली खोटी असल्याचे आपण सांगतात, तर मग खरी नियमावली कोणती, हे स्पष्ट केल्यास नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर होतील. आता ही नियमावली खरी नाही म्हणता म्हणता निवडणुकीनंतर हीच नियमावली खरी म्हणून सादर करण्यात आली तर त्यात नाशिककरांना आश्चर्य वाटू नये. नाशिककरांवर आत्तापर्यंत असाच अन्याय होत आला असून, आता तर जुनी नियमावली नाही आणि नवीनही नाही, अशा कात्रीत महापालिका आणि व्यावसायिक सापडले आहेत. आपला पक्ष नाशिक महापालिकेत सत्तास्थानी आला तरी आश्वासनांची पूर्तता करायची किंवा नाही हे लोकभावनेपेक्षा सरकारी मर्जीवर अवंलबून राहणार आहे. कारण नाशिककर निरुपद्रवी आहेत, हे आपणास माहीत आहेच !- अरुण काबरे,वास्तुविशारद, नाशिक
मग, खरी नियमावली कोणती?
By admin | Updated: February 14, 2017 01:27 IST