सुरगाणा : येथील आसावरी पेट्रोल-पंपावर रविवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची वायर कापून लोखंडी तिजोरीतून नऊ लाख ६७ हजार रुपयांची रोकड चोरून नेली.उंबरठाण रस्त्यालगत येथील श्रीमंत रत्नशीलराजे तेजसिंहराजे पवार यांचा पेट्रोलपंप आहे. याच ठिकाणी त्यांचे आॅफिस असून, तेथेच दुसऱ्या खोलीत लोखंडी तिजोरी ठेवली आहे. या तिजोरीत गेल्या तीन-चार दिवसांची आलेली रोख रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी ठेवली होती. मात्र रविवारी रात्री अज्ञात चोरट्याने टेबलाच्या खणात ठेवलेल्या चाव्या घेऊन तिजोरी उघडून आत ठेवलेल्या नऊ लाख त्रेसष्ठ हजार रुपयांची धाडसी चोरी केली.चोरी करण्यापूर्वी चोरट्याने तिजोरी ठेवण्यात आलेल्या खोलीतील व बाहेरील मुख्य सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कापली होती. येथील लहान खिडकीचा एक गज कापलेला आहे. मात्र कुणीही मोठी व्यक्ती त्या खिडकीतून आत-बाहेर जाऊ शकत नाही. कुठलीही तोडफोड न करता सहजरीत्या ही धाडसी चोरी केल्याने कुणी तरी माहीतगार व्यक्तीनेच ही चोरी केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, त्या दिशेने तपास सुरू केला आहे.दरम्यान, कळवण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन गुंजाळ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून माहिती घेतली. यावेळी येथील पोलीस निरीक्षक सुरेश पारधी उपस्थित होते. (वार्ताहर)
मुखेड येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न
येवला : मुखेड येथे रविवारी मध्यरात्नी महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला; मात्न यात चोरट्याला यश आले नाही. शनिवारी बँक बंद करताना मशीनमध्ये तीन लाख रु पये टाकले असल्याची माहिती आहे. सुरक्षारक्षक नसल्याने चोरट्याने एटीएम सेंटरजवळ येताच सीसीटीव्ही कॅमेर्याची वायर तोडून कॅमेरा व अलार्म बंद केला. मशीन फोडून त्यातून रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्न, त्यात चोरट्याला यश आले नाही. पकडल्या जाण्याच्या शक्यतेने चोरट्याने तेथून धूम ठोकली. या प्रकरणी येवला तालुका ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली असून, तालुका पोलिसांनी श्वान पथकाची मदत घेऊन चोराचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मनमाड पोलीस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तालुका पोलीस निरीक्षक रूपचंद वाघमारे याच्यासह येवला तालुका पोलीस पुढील तपास करत आहे.