सरदवाडी : सिन्नर तालुक्यातील सरदवाडी गावालगतच्या शेतांमध्ये बछड्यांसह बिबट्याने ठाण मांडले आहे. अनेकांना अगदी जवळून बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली असून, रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यास कोणी धजावत नसल्याचे चित्र आहे.नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या सिन्नर बाह्यवळण रस्त्याचे काम सरदवाडीलगत झपाट्याने सुरू आहे. रात्रंदिवस काम सुरू असल्याने रस्त्यासाठी मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरचालकांना गेल्या महिन्यापासून सरदवाडी शिवारात रात्रीच्या वेळी अनेकदा बछड्यांसह बिबट्या दिसून आला होता. याशिवाय काही शेतकऱ्यांनाही शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले होते.मंगळवारी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास दुचाकीवरील दोघा युवकांनी पाहिलेला बिबट्या काही मिनिटांतच माळेगावकडून सरदवाडीकडे येणाऱ्या सागर बोऱ्हाडे या तरुणाच्या दुचाकी समोरून गेला. बुधवारी रात्री पुन्हा ११ वाजेच्या सुमारास गणेश बोऱ्हाडे हा युवक ग्रामपंचायत कार्यालयासमोरून जात असताना पलीकडच्या शेतातून त्याला गुरगुरण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने पाहिले असता चमकणाऱ्या डोळ्यांचा बिबट्या दबक्या पावलांनी आपल्याकडे येत असल्याचे पाहून गणेशने घराकडे धूम ठोकली. याचवेळी जवळ उभ्या असलेल्या श्याम बोऱ्हाडे यांच्याही सदर प्रकार लक्षात आल्याने त्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या कुंपणात धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील शेतात पाहणी केली असता तेथे पावले आणि नखांच्या खुणा आढळून आल्या. याबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनीही पाऊलखुणांची पाहणी करून सदर पावले मादी बिबट्याचीच असल्याचे सांगितले. यापूर्वी शिवारात अनेकदा दिसून आलेल्या बिबट्याने आता थेट गावालगतच ठाण मांडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विहिरींमध्ये पाणी असूनही ते पिकांना देण्यास बिबट्याच्या भीतीपोटी कोणी धजावत नसल्याचे चित्र आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी सरदवाडी येथे पिंजरा बसविण्याची मागणी ग्रामपंचायतीने वनविभागाकडे पत्राद्वारे केल्यानंतर गुरुवारी सायंकाळपर्यंत पिंजरा लावण्याचे आश्वासन वन अधिकाऱ्यांनी दिले. (वार्ताहर)
सरदवाडी गावालगत बछड्यांसह बिबट्याचे ठाण
By admin | Updated: February 4, 2016 22:40 IST