नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात सध्या हिवाळा, उन्हाळा व पावसाळा या तीनही ऋतूंचा अनुभव दिवसभरात येत आहे. वातावरणातील या बदलामुळे शेतमालाचे संगोपन करताना शेतकरीवर्गाची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे. पहाटेच्या वातावरणातील गारवा हिवाळा, तर दुपारी उकाडा आणि गरम हवा उन्हाळ्याची आठवण करून देतो. सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी होऊन रिमझिम कोसळणारा पाऊस पावसाळ्याची अनुभूती देत असतो. चोवीस तासांत तीनही ऋतू नायगाव खोऱ्यात अनुभवास येत आहेत. हवामानात झपाट्याने पडणाऱ्या फरकामुळे रब्बीच्या नियोजनात बिघाड झाला असून, शेतकरीवर्ग संभ्रमात सापडला आहे. वारंवार बदलणाऱ्या वातावरणामुळे शेतमालावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन पिके शेतातच नष्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. खरिपाचे नुकसान झाल्यानंतर अस्थिर हवामानातच रब्बीच्या पिकांचे नियोजन सुरू झाले आहे. मात्र वातावरण पूर्वपदावर येण्याऐवजी दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची निवड करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नायगाव खोऱ्यात खरिपाची सांगता होऊन रब्बीला सुरुवात झाली आहे. परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने पाण्याची पातळी खालावत असल्यानेच बिघडलेले वातावरण स्वच्छ होत नाही. त्यामुळे कमी पाण्यात येणारे व रोगांचा प्रतिकार करणारी पिकेच डोळ्यासमोर ठेवून शेतकरी रब्बीचे नियोजन करताना दिसत आहेत. सध्या नायगाव खोऱ्यात लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कांद्याबरोबर कोबी, फ्लॉवर, टमाटे, मिरची या पिकांचीही परिसरात लागवड केली जाते. वापरलेले भांडवलही न फिटता संपूर्ण खरीप हंगाम हातातून गेला आहे. रब्बीलाही सुरुवातीपासून हवामान खराब होत राहिल्याने पिकांच्या लागवडीसाठी येणारा खर्चाचा विचार करता शेतकऱ्यांची पिकांचे नियोजन करताना तारांबळ उडत आहे. वारंवार वातावरणात बदल होत असल्याने मशागतीचे नियोजन खोळंबून पडले आहे. (वार्ताहर)
सकाळपासूनच दमट हवामानामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. हवेचे प्रमाण कमी झाल्याने घामाच्या धारांनी नागरिक न्हाऊन निघत आहे. ढगाळ हवामानामुळे सूर्य दर्शन होत नसल्याने कोंदट वातावरणामुळे जीवाची लाही लाही होत आहे. त्यामुळे डास, चाचणे व अन्य किटकांचा वावर वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.