नाशिक : अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके - जोशी यांनी दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. गतवर्षी सिन्नरमध्ये हा प्रकार घडला होता़ २० सप्टेंबर २०१३ रोजी आरोपी आशिष ज्ञानेश्वर चतुरवार (२१, मूळ रा. चंद्रपूर, सध्या रा. सिन्नर) याने घराजवळ राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीस फूस लावून पळवून नेले होते. मुलीच्या आईवडिलांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र ती आढळून आली नाही़ दरम्यान, रात्री ९ वाजेच्या सुमारास मुलीने वडिलांना दूरध्वनी करून आशिषसोबत असल्याचे सांगितले. त्यानुसार मुलीच्या वडिलांनी सिन्नर पोलीस ठाण्यात संशयित आशिष चतुरवार विरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार सिन्नर पोलिसांनी आशिषला अटक करून त्याच्यावर फूस लावून पळवून नेणे तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या खटल्याची अतिरिक्तजिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फाळके-जोशी यांच्या न्यायालयात सुरू होता़ यामध्ये सरकारी वकील अॅड़ सुप्रिया गोऱ्हे यांनी सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेले साक्षीदार व पुराव्यानुसार आरोपी आशिषवर गुन्हा सिद्ध झाला़ त्यास दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली़ दंडाच्या रकमेतील पाच हजार रुपये पीडित मुलीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी
By admin | Updated: November 30, 2014 01:06 IST