नाशिक : प्रथम वर्ष प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठाने दिलासा दिला आहे. ज्या महाविद्यालयात गुणवत्ता यादीनंतरही प्रवेश मिळाले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी आता दहा टक्के अतिरिक्त जागा ठेवण्याचे आदेश पुणे विद्यापीठाने दिले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न मिटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर्षी पुणे विद्यापीठाच्या आदेशानुसार प्रथमवर्षाचे प्रवेशदेखील गुणवत्तेनुसार करण्यात आले. बारावी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षासाठी अर्ज दाखल केले होते, त्या सर्वांनाच प्रवेश मिळाला असे नव्हे तर सुमारे २० ते २५ टक्के विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित आहेत. विशेषत: वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची अडचण प्राधान्याने जाणवली. या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयांकडे तगादा लावला होता. प्रवेश कधी मिळेल याविषयी मात्र महाविद्यालयांकडून कोणतीही स्पष्टता दिली जात नसल्याने या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रकरणाच्या तक्रारी तसेच महाविद्यालयांनीदेखील प्रवेशाबाबत काय करावे, असा अभिप्राय विद्यापीठाला विचारला होता. त्यानुसार विद्यापीठाने जे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी दहा टक्के जागा महाविद्यालयांनी उपलब्ध करून द्याव्यात असे आदेशित केल्यामुळे आता या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी)
दहा टक्के विद्यार्थ्यांना घेणार सामावून
By admin | Updated: July 12, 2014 00:27 IST