येवला : महाराष्ट्र शासनाने जवळपास २०६२ जागांसाठी शिक्षक भरती, तर ३९०२ उमेदवारांची मुलाखतीची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. सरकारच्या या घोषणेला अध्यापक भारतीने आक्षेप घेतला आहे.
आपल्या आयुष्याची वीस वर्षांहून अधिक काळ वेठबिगारी करणाऱ्या विनाअनुदानित ज्ञानदात्यास हक्काचे वेतन द्या, नंतरच नवीन शिक्षक भरती करा, अशी मागणी अध्यापक भारतीचे शरद शेजवळ यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
अध्यापक भारतीने म्हटले आहे, विनाअनुदानित शिक्षक उद्ध्वस्त झाला असून, भिकेला लागला आहे. प्रथमतः विनाअनुदानित शिक्षकांना त्यांच्या श्रमाचे दाम द्या, नंतरच नवीन शिक्षक भरती करा. सरकारकडे पैसा नाही या सबबीवर गेल्या वीस वर्षांपासून सरकार विनाअनुदानित शिक्षकांच्या आयुष्याशी खेळत आहे आणि आता नवीन शिक्षकांची भरती करून त्यांना वेतन तरतूद कोठून करणार आहेत असा प्रश्नही या निवेदनात उपस्थित केला आहे.
शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांपैकी ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस केली आहे. राज्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे २७ हजार आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे १३ हजार अशी एकूण ४० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात ६१०० जागा भरण्यात येणार आहेत. हजारो शिक्षक उपाशी असताना नवीन शिक्षक भरतीचा घाट का? असा सवालही अध्यापक भारतीच्या निवेदनाच्या शेवटी सरकारला केला आहे.
इन्फो
पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती सरळसेवेने करा
डी.एड., बी.एड. धारक आदिवासी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्याची सरकारने त्वरित दखल घ्यावी. आदिवासी समाजातील डी.एड., बी.एड. धारक विद्यार्थ्यांनी शिक्षक भरतीसाठी पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या १६६२ रिक्त जागा सरळसेवा शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. त्याची दखल घ्यावी, असेही या निवेदनात शेजवळ यांनी म्हटले आहे.