नाशिक : महागड्या औषधांसाठी उपचारांकडे पाठ फिरविणाऱ्या रुग्णांना उपचारांच्या मार्गावर आणण्यासाठी दिला जाणारा भत्ता आता खासगी रुग्णालयातील क्षयरुग्णांनाही देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी शासनाकडून घेण्यात आला होता. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांच्या औषधातही खंड पडू नये, यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा मात्र यंत्रणेलाच विसर पडल्याने पोषण भत्त्याचा विसर पडल्याने त्यांना पोषण भत्ताच मिळालेला नाही. सध्या ॲक्टिव्ह असलेल्या रुग्णांपैकी चोवीस हजार रुग्णांनी खाते क्रमांकच दिलेला नाही. त्यामुळे तेदेखील या भत्त्यापासून वंचित राहिले आहेत.
क्षयरुग्णांसाठी सरकारने योजना हाती घेतल्या असल्या तरी उपचारांपासून दूर जाणारे रुग्ण हा त्यातील सर्वांत मोठा अडथळा ठरतो. सरकारी रुग्णालयात हे उपचार मोफत होत असले तरी खासगी रुग्णालयांची निवड करीत कालांतराने महागड्या उपचारांचा खर्च परवडत नसल्याने उपचार अर्धवट सोडणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांतर्फे नोंदविले जाते. मात्र, उपचार अर्धवट सोडल्याने क्षयरोगाचा संसर्ग अधिक होतो. अशा रुग्णांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना दर महिन्याला प्रत्येकी ५०० रुपये देण्याची योजना सरकारतर्फे राबविली जात होती. यापूर्वी केवळ शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना हा आर्थिक लाभ दिला जात होता. मात्र, आता सरकारने याबाबतची नवी नियमावली नुकतीच लागू केली असून, त्यानुसार खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांनाही दर महिन्याला पाचशे रुपये दिले जाणार आहेत.
पोषक आहाराची गरज
क्षयाच्या रुग्णांना औषधांसह पोषक आहाराची गरज असते. पोषक आहार आणि औषधे यांचा समन्वय साधून या रोगावर मात करता येत असल्याने प्रत्येक गरजू रुग्णाला पोषक आहार देण्याचा प्रयत्न सुरुवातीला शासकीय पातळीवर केला जात होता. मात्र, आहाराऐवजी रुग्णाच्या खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी शासनातर्फे घेण्यात आला होता. मात्र, आता अशा रुग्णांची नोंदणीच होत नसल्याने त्यांना पोषण आहार मिळणेच बंद झाले आहे.
उपचार पूर्ण मोफत
सर्व रुग्णांना उपचार मिळत आहेत. या धोरणामुळेही क्षयरुग्णांचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळत आहे. क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची सरकारी दवाखान्यात मोफत थुंकी तपासणी करण्यात येत आहे. संशयित रुग्णांची एक्स रे तपासणीदेखील मोफत केली जात आहे. या व्यतिरिक्त क्षयरोगावरील औषधोपचार व तपासणीबाबत माहिती देण्यासाठी टोल फ्री सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. टोल फ्री क्रमांकावर संपर्क केल्यानंतर संबंधितांना क्षयरोगाबाबत माहिती दिली जात आहे.
क्षयरोगाची लक्षणे
क्षयरोग हा ‘मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरकोलोसिस’ या जीवाणुंमुळे होतो. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, भूक न लागणे, सातत्याने वजन कमी होणे, ताप येणे ही काही क्षयरोगाची लक्षणे आहेत. क्षयरोगाची तपासणी होऊन नियमित औषधोपचार घेतल्यास क्षयरोग हा सहा महिन्यांतदेखील पूर्णपणे बरा होऊ शकतो, हे आता सर्वसामान्यांनादेखील समजले आहे. त्यामुळेच क्षयरोगाची जनमानसावरील धास्ती कमी झाली आहे.