नाशिक : टाटा समूहाचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा हे सोमवारी (दि.३०) प्रथमच नाशिक भेटीवर आले होते. यावेळी शहरातील उद्योजकांनी टाटा यांना शहराच्या उत्पादन क्षेत्रात आर्थिक वाढीसाठी गुंतवणूक करण्यासंबंधी साकडे घातले.पांडवलेणीजवळील नेहरू वनोद्यान (बॉटनिकल गार्डन) येथे निमा, आयमा, क्रेडाईच्या सदस्यांनी टाटा यांची भेट घेत स्वागत के ले. यावेळी टाटा यांच्यासोबत नाईसचे अध्यक्ष उद्योजक विक्रम सारडा, निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उदय खरोटे, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया, ज्ञानेश्वर गोपाळे, किरण चव्हाण, रतन लथ, डॉ. राज नगरकर, सुनील भायबंग, अॅड. नंदकिशोर भुतडा आदिंनी संवाद साधला. दरम्यान, निमाच्या शिष्टमंडळाच्या वतीने टाटा यांना नाशिकमध्ये उत्पादन क्षेत्रात गुंतवणुकीसंबंधी निवेदन देण्यात आले. नाशिक ‘वाइन कॅपिटल’ आपली नवीन ओळख निर्माण करत आहे. कृषी, फळ प्रक्रिया उद्योग, अभियांत्रिकी, औषधशास्त्र, अभियांत्रिकी आदि प्रकारच्या उद्योगधंद्यांसाठी नाशिकला औद्योगिकदृष्ट्या पहिली पसंती उद्योजकांकडून दिली जाते. नाशिकमध्ये कु शल कामगार वर्ग व उत्तम औद्योगिक वातावरणदेखील उपलब्ध आहे. तसेच नाशिक हे उत्तम शैक्षणिक हब म्हणून विकसित होत असून, तब्बल वीस संस्था या ठिकाणी ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. यामुळे नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला मोठा आधार आहे. त्यामुळे उत्पादन क्षेत्रामध्ये आपण नाशिकमध्ये आर्थिक वाढीसाठी गुंतवणुकीचा विचार करावा, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर बॅनर्जी व खरोटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, उद्योगक्षेत्रातील सर्वच मान्यवर यावेळी उपस्थित होते. रतन टाटा यांच्यासोबत उपस्थित डॉक्टर, वकील, बिल्डर, उद्योजकांनी यावेळी संवाद साधला. (प्रतिनिधी)
नाशिकमध्ये गुंतवणुकीसाठी टाटा यांना उद्योजकांचे साकडे
By admin | Updated: January 31, 2017 00:58 IST