पाथर्डी फाटा : वासननगरमधील पोलीस वसाहतीचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा वादग्रस्त झाला असून, मनपाच्या टँकरचालकाच्या अरेरावीमुळे शनिवारी येथील महिला व युवकांच्या संतापात भर पडली. टँकरचालकाची या भागातून बदली करण्याचे व रविवारपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन मिळाल्याने संतप्त युवक व महिला शांत झाल्या.गेल्या आठवड्यापासून वासननगरमधील पाणीपुरवठ्याची रात्रीची वेळ बदलून सकाळी दहा ते बारा करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात महिला वर्गात समाधानाचे वातावरण असताना गेल्या चार दिवसांपासून पोलीस वसाहतीला कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा झाल्याने तशी तक्रार संबंधितांकडे करण्यात आली. मनपाच्या टँकर चालकांनी टँकरने पाणी देताना पैशांची मागणी, तर केलीच शिवाय बोलताना उद्धट भाषेचा वापर केल्याचा आरोप येथील महिलांनी व युवकांनी केला.पोलीस वसाहतीच्या अर्जुन आघाव व इतरांनी ही परिस्थिती नगरसेवक सतीश सोनवणे यांच्या निदर्शनास आणून दिली. सोनवणे यांनी नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन घटनास्थळ गाठले. पोलीस वसाहतीसमोरचा वॉल्व्ह दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अधिकाऱ्यांनीही तसे आश्वासन उपस्थितांना दिले आणि वादग्रस्त टँकरचालकाची या भागातून तत्काळ बदली करण्याचे आश्वासन नगरसेवक व अधिकाऱ्यांनी दिले. तेव्हा तणाव निवळला. नगरसेवक सोनवणे व मनपाने प्रत्येकी दोन टँकर पाठविल्याने वसाहतीची आजची गरज भागली. वसाहतीतील बोअरवेलही खुला करण्यात आल्याने पुरसेपाणी मिळू शकेल, असे लाईन सार्जंट अर्जुन आघाव यांनी सांगितले. (वार्ताहर)
आधीच पाणीटंचाई त्यात उर्मट टॅँकर चालक पोलीस वसाहतीतील
By admin | Updated: October 24, 2015 23:59 IST