लोहोणेर : येथे गेल्या १५ दिवसांपासून ग्रामसेवक व तलाठी हजर नसल्याने ग्रामस्थांची कुचंबणा होत आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक, रहिवासी दाखले इतर शासकीय कागदपत्रे मिळवण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.येथे कार्यरत असलेले तलाठी एम. डी. पवार हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या कामाचा भार खालप येथील तलाठी किरण जयस्वाल यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांच्याकडे लोहोणेर व्यतिरिक्त खालप, वासोळ, फुलेनगर आदि परिसरांचा कारभार आहे. लोहोणेर येथील खातेदारांची संख्या लक्षात घेता शेतकऱ्यांना त्यांच्या सातबारा उतारा, खाते उतारा, उत्पन्नाचे दाखल्यासह शासकीय व शैक्षणिक कागदपत्रे मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कागदपत्रे तलाठी कार्यालयातून मिळत असताना तलाठी उपलब्ध नसल्याने नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावी लागत आहे. सध्या शैक्षणिक दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची व त्याचबरोबर पालकांचीही धावपळ सुरू आहे. तलाठी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहे. एकीकडे गावात तलाठी नाही तर दुसरीकडे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक संपावर गेले असल्याने ग्रामस्थांची चांगलीच अडचण होत आहे. ग्रामविकास अधिकारी उपलब्ध नसल्याने ग्रामविकासाची, ग्रामस्वच्छतेची कामे विलंबाने होत आहे. लोहोणेर येथील कामकाजाचा भार लक्षात घेता स्वतंत्र तलाठ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. (वार्ताहर)