सिन्नर : जिल्ह्यात चोरट्यांनी मंदिरांना लक्ष्य केल्याने खबरदारीचा उपाय म्हणून येथील पोलीस ठाण्यात मंदिर विश्वस्त व पुजारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरांचे पावित्र्य व सुरक्षिततेसाठी विश्वस्तांनी उपाययोजना करून काळजी घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी केले. अलीकडच्या काळात मंदिरातील दागिने चोरी, दानपेट्या फोडणे आदि घटना घडत आहेत. त्यासाठी मंदिरात मौल्यवान दागिने अगर वस्तू ठेवू नये असे आवाहन शिंगटे यांनी केले. मंदिरात व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ बसवून घ्यावेत, पुजाऱ्यांनी मंदिरातील दागिने व दानपेटी यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, मंदिराच्या दानपेटीतील पैसे दर दोन दिवसांनी काढून घ्यावेत, रात्रीच्या वेळी मंदिरास कुलूप लावून घ्यावे, मंदिराच्या ठिकाणी एक खासगी सुरक्षा रक्षक नेमावा, मंदिर परिसराच्या दर्शनी भागात पोलीस ठाण्याचा क्रमांक लावावा जेणेकरून भाविकांना आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणे सोपे जाईल, ज्या मंदिरात दागिने मोठ्या प्रमाणात आहे त्या मंदिर विश्वस्तांनी शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमणे आवश्यक असल्याचे शिंगटे यांनी सांगितले. त्यासाठी आवश्यक सहकार्य पोलिसांकडून करण्यात येईल, असे ते म्हणाले. बैठकीस मधुकर भगत, अण्णा वरंदळ, किरण लोणारे, मदन देशमुख, दत्ता लोळगे, राजेंद्र देशमुख, भगवान सटवे यांच्यासह भैरवनाथ मंदिर, गावठा मारुती मंदिर, सप्तशृंगी देवी मंदिर, लाड सुवर्णकार मंदिर, कालिका मंदिर, कालभैरवनाथ मंदिर आदिंसह शहरातील मंदिरांचे विश्वस्त व पुजारी उपस्थित होते. (वार्ताहर)
मंदिरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या
By admin | Updated: November 25, 2015 22:33 IST