सिन्नर : तालुक्यातील काही शाळांमध्ये आदिवासी, गोरगरीब विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर फी वसूल केली जाते. अशा शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करून त्यांंना पाठीशी घालणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी एकलव्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांकडून अवैध फी वसूल करून पावत्या दिल्या जात नाहीत. पैसे न भरल्यास प्रवेश दिला जाणार नसल्याचे काही शाळांकडून पालकांना उत्तरे दिली जातात. यावर संघटनेचे पदाधिकारी गटशिक्षण अधिकारी साळुंखे यांना भेटले असता ‘आम्ही शाळांना काही सांगू शकत नाही, पैसे भरा व शाळेत प्रवेश करा,’ असे विसंगत उत्तर देऊन ‘त्या’ शाळांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रश्नांची सोडवणूक न केल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. निवेदनावर संघटनेचे राज्य सचिव विजय बर्डे, तालुकाध्यक्ष किरण मोरे, अशोक मोरे, विजय पिंपळे, गोविंद हांडे, गोविंद गोळेसर, भास्कर माळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
गटशिक्षण अधिकारी यांच्यावर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST