नाशिक : दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान उफाळलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ तसेच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा नाशिकतर्फे शनिवारी (दि. ३०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हुतात्मा दिन बैठा सत्याग्रह आंदोलन करीत लाक्षणिक उपोषण केले.
दिल्लीच्या सीमांवर दोन महिन्यांपासून केंद्र सरकारने केलेल्या तीन शेतकरी कायद्यासह प्रस्तावित वीज बिल कायद्याच्या विरोधात तसेच शेतीमालाला हमीभाव देणारा कायद्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. परंतु, २६ जानेवारीला दिल्लीत लाल किल्ल्यावर भाजप पुरस्कृत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा आरोप करीत त्याच्या निषेधार्थ तसेच शेतकरी आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महात्मा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करीत शांततामय, अहिंसक आंदोलननाचे समर्थन करण्यात आले. आंदोलकांनी केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला असून केंद्र सरकारने कितीही षडयंत्र केले तरी शेतकऱ्यांचे आंदोलन कायदे रद्द होईपर्यंत व हमीभावाचा कायदा अस्तित्वात येईपर्यंत संपणार नाही, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. यावेळी ठिय्या सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी तसेच शेतकरी आंदोलनाला बळ देण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्यासह संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा नाशिकतर्फे राजू देसले, सुनील मालुसरे, शरद आहेर, रंजन ठाकरे, डॉ डी एल कराड, अनिता पगारे, महादेव खुडे, व्ही. डी. धनवटे, विजय दराडे, विजय पाटील, नाना बच्छाव, किरण मोहिते, समाधान बागुल, शांताराम चव्हाण, ॲड. प्रभाकर वायचळे, बबलू खैरे, नाझीम काझी, निशिकांत पगारे, डॉ शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, मुकुंद रानडे, ॲड. तानाजी जायभावे आदी उपस्थित होते.
(फोटो-२० पीएचजेए ८२) हुतात्मा दिन बैठा सत्याग्रह आंदोलन करताना उत्तमराव कांबळे, शरद अहेर, डॉ. हेमलता पाटील, ॲड. तानाजी जायभावे, ॲड. सुरेश आव्हाड. नीलेश खैरे. अनिता पगारे, शीतल पवार, ॲड. प्रभाकर वायचळे, वत्सला खैरे, नाझीम काझी आदी.