नाशिक : मुंबई-पुणे पाठोपाठ नाशिक शहरात स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण आढळून येत असल्याने महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केली असून, शहरात बारा ठिकाणी स्क्रिनिंग सेंटर सुरू करतानाच पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून दिल्याची माहिती आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली.शहरात गेल्या तीन महिन्यांपासून स्वाइन फ्लूची लागण झालेले रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत. आतापर्यंत शहरात ८ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, त्यातील एकाचा बळी गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याने स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेने सावधानता बाळगत शहरात बारा ठिकाणी स्क्रिनिंग सेंटर सुरू केले आहे. त्यात कथडा रुग्णालय, बिटको रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, पिंपळगाव खांब दवाखाना, सिडकोतील श्री स्वामी समर्थ रुग्णालय, सिन्नर फाटा येथील फिरता दवाखाना, सातपूर, पंचवटी येथील फिरता दवाखाना, जिजामाता प्रसूतिगृह, सातपूरमधील मायको प्रसूतिगृह व उपनगर येथील प्रसूतिगृहांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संशयित रुग्णांवर उपचाराकरिता जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड कार्यान्वित करण्यात आला आहे.