नाशिक : एकीकडे यमन कल्याण, भीमपलास, सारंग अशी रागदारी... तर दुसरीकडे ‘काटा रुते कुणाला’, ‘जय गंगे भागीरथी’ अशा गीतांचे गायनाचे स्वर कुसुमाग्रज स्मारकात दिवसभर घुमले. निमित्त होते कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ख्याल व उपशास्त्रीय गायन स्पर्धेचे. या दोनदिवसीय स्पर्धेचा समारोप झाला. स्पर्धेचा निकाल सोमवारी (दि.१२) प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे. कुसुमाग्रज स्मारकातील दोन सभागृहांत दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धेला सकाळी प्रारंभ झाला. ख्याल गायनात मंगेश कुलकर्णी, सुनील पारे, संतोष देशमुख, कौस्तुभ कुलकर्णी, नेहा लाकडावाला, कुलभूषण कहाळेकर, अरुण चितळे, रोहित धारप, रोहित गावडे यांनी, तर उपशास्त्रीय गायनात योगेश रणमळे, श्रुती टोके, निहिरा देहूकर, श्रद्धा तोडणकर, रूपा नाईक, रोहन गावडे, आशुतोष खराडे आदिंनी सहभाग घेतला. त्यांना नितीन वारे, नितीन पवार, प्रमोद भडकमकर, सतीश पेंडसे (तबला), सुभाष दसककर, आनंद अत्रे, दिव्या रानडे, प्रसाद गोखले (संवादिनी) यांनी संगीतसाथ केली. स्पर्धेत मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, अकोला, बेळगाव, अहमदनगर या राज्यांच्या विविध भागांतून कलावंत सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
रागदारीसह सुगम संगीताचे घुमले स्वर...
By admin | Updated: October 11, 2015 23:44 IST