नाशिक : नाशिकरोड येथे दरोड्याच्या गुन्ह्याचे आरोपपत्र दाखल करण्यास दिरंगाई केल्याने यातील एका आरोपीस जामीन मिळाला़ यामुळे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई आयुक्तांनी केली आहे़ २७ जुलैला भरदुपारी चार-पाच जणांच्या सशस्त्र टोळक्याने दत्तमंदिररोडवरील ड्रीम हाऊस इमारतीतील मे़ शहाणे सराफ या सुवर्णपेढीवर दरोडा टाकून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवित सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला होता़ या दरोडेखोरांचा विरोध करणाऱ्या दुकान मालकाला रिव्हॉलव्हरमधून पोटात गोळी मारून गंभीर जखमी केले होते़ यामुळे शहरात दहशत पसरली होती़ दरम्यान, पोलीस आयुक्त व अधीक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासचक्रे फि रविल्याने अवघ्या दोन तासांत भिवंडीजवळील पडघा येथे ठाणे ग्रामीण पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले होते व नंतर संपूर्ण टोळी पोलिसांनी शिताफीने पकडली होती़ यातील एका गुन्हेगाराचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यास उपनगर पोलिसांनी विलंब केल्याने सदर आरोपींची जामिनावर मुक्तता झाली़ दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यात हलगर्जीपणा केल्याने सावंत यांच्यावर पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी निलंबनाची कारवाई केली़ गंभीर गुन्ह्यात आरोपपत्र दाखल करण्यात पोलिसांनी दिरंगाई केल्याने आरोपीला नियमाप्रमाणे जामीन द्यावा लागला़ यामुळे न्यायालयाने पोलिसांवर गंभीर ताशेरे ओढले होते़ यामुळेच आयुक्तांनी ही कारवाई केल्याची पोलिसांमध्ये चर्चा होती़ (प्रतिनिधी)
पोलीस निरीक्षक हेमंत सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई
By admin | Updated: November 14, 2014 01:37 IST