नाशिक : ओझर विमानतळ आवारात अधिकाऱ्यांच्या मद्यपार्टी प्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याने चार शाखा अभियंत्यांना निलंबित करण्याची कारवाई वाघ मारल्याच्या अर्विभावात केली असली तरी, प्रत्यक्षात या चार अभियंत्यांच्या दोषापेक्षा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर मेहरनजर दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालविल्याची चर्चा होऊ लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १७ अभियंत्यांचे निलंबन केले, त्यात नाशिक जिल्'ातील डी. टी. भदाणे, गडाख, राहुल पाटील, एम. यू. मोरे या उप अभियंता, शाखा अभियंता असलेल्या चौघांचा समावेश आहे. सरकारच्या या पावलाने दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईस सुरुवात झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात असले तरी, प्रत्यक्षात ही कारवाई म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या चौघांनी व्हॉट््स अॅपवरून अधीक्षक अभियंता पी. व्ही. देशमुख यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त ठेकेदार कैलास बिरारी यांनी ओझर विमानतळ आवारात आयोजित केलेल्या पार्टीचे निमंत्रण अन्य सहकाऱ्यांना पाठविले होते. खात्यांतर्गत चौकशीत ही बाब उघडकीस आल्यामुळे निव्वळ निमंत्रण दिल्याचे कारण त्यांच्या निलंबनासाठी पुरेसे ठरविण्यात आले आहे. मात्र या मद्यपार्टीसाठी ओझर विमानतळ आवार उपलब्ध करून देणारे कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील, उप अभियंता सोनवणे त्याच बरोबर ज्यांच्यासाठी ही मद्यपार्टी आयोजित करण्यात आली व त्यांनी राजीखुषीने त्यात हजेरी लावली ते पी. व्ही. देशमुख यांच्यावर मात्र मुख्यमंत्र्यांनी मेहेरनजर दाखविली आहे. या मद्यपार्टीशी संबंधित व त्यात सहभागी झालेले अशा अधिकाऱ्यांची संख्या ४६ इतकी असल्याचे सांगितले जात असून, त्यापैकी फक्त चौघांवरच संक्रांत कोसळली आहे. अन्य अधिकाऱ्यांना अभय देण्यात आले की काय असा प्रश्न विचारला जात आहे.
अधिकाऱ्यांचे निलंबन : चोर सोडून संन्याशाला फाशी
By admin | Updated: February 20, 2015 01:13 IST