नाशिक : मोक्का गुन्हेगारांना आर्थिक छुपी मदत करत त्यांना वरदहस्त उपलब्ध करून दिल्याच्या संशयावरून पोलिसांच्या रडारवर असलेले शिवसेनेचे सहयोगी सदस्य निफाडचे नगरसेवक किरण बाजीराव कापसे याची कसून चौकशी केली होती. कापसे याने घरात गावठी कट्टा ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. शनिवारी (दि. १३) पोलिसांनी त्याच्या गंगापूर रोडवरील राहत्या घराची झडती घेतली. दरम्यान, कायद्यानुसार प्रतिबंधित असलेला २३ सेंटीमीटर लांबीचा मोठा सुरा घरात आढळून आला.महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली अटक करण्यात आलेल्या हनुमानवाडी कॉर्नरवरील खुनाच्या गुन्ह्णातील संशयित आरोपी करण रवींद्र परदेशी, कुंदन सुरेश परदेशी, अजय जेठा बोरिसा, अक्षय कैलास इंगळे यांना नगरसेवक किरण कापसेसह अन्य सहा संशयितांची मागील महिन्यात सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनी कसून चौकशी केली होती. चौकशीदरम्यान, कापसे यास पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचविणाऱ्या कृत्यापासून लांब राहण्याचा इशारा दिला होता. कापसे याने घरात गावठी कट्टा ठेवल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे व गुन्हे शोध पथकाने तातडीने पंपिंग स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सोमनाथ पार्क सोसायटीच्या तिसऱ्या क्रमांकाच्या सदनिकेची झडती घेतली. कापसे कुटुंबासमवेत या ठिकाणी वास्तव्यास आहे. मात्र सकाळपासून सदर संशयित घरातून निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. झडतीमध्ये अडीच इंच रुं द व २३ सेंटिमीटर लांबीचे पाते असलेला मोठा सुरा पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी कापसेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारवाईची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील व सरकारवाडा पोलिसांचे पथकही सोसायटीच्या आवारात दाखल झाले. पाटील यांनी पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले असून, तातडीने कापसेच्या शोधासाठी पथक तयार करण्यास सांगितले आहे. कापसेविरुद्ध पंचवटी, सरकारवाडा, गंगापूर, निफाड पोलीस ठाण्यांमध्ये जबरी लूट, चोरी, मारहाण यांसारखे गुन्हे दाखल आहेत. तसेच मोक्काच्या आरोपींना आश्रय देणे व आर्थिक मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली होती. कापसेच्या वर्तणुकीमध्ये सुधारणा होत नसून संशयास्पद हालचाली सुरूच असल्याने त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.
निफाड येथील नगरसेवकाच्या घरात आढळला सुरा
By admin | Updated: August 14, 2016 02:41 IST