नांदगाव- पंचायत समिती सभापतीपदासाठीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या साकोरे गणातून निवडून आलेल्या सुमनताई निकम यांची सभापतिपदी तर उपसभापतिपदी वेहेळगाव गण सदस्य सुभाष कुटे यांची बिनविरोध निवड झाली. भाजपाने सभापतीपदासाठी मधुबाला खिरडकर व उपसभापतीपदासाठी साहेबराव नाईकवाडे यांचे अर्ज दाखल केले होते. परंतु शेवटच्या मिनिटांमध्ये त्यांनी आपले नामनिर्देशन मागे घेतले. तहसीलदार चंद्रकांत देवगुणे अध्यासी अधिकारी होते. त्यांनी उपरोक्त निवड झाल्याचे जाहीर केले.आठ सदस्यीय पंचायत समितीमध्ये पाच सदस्य शिवसेनेचे तर भाजपाचे तीन सदस्य आहेत. त्यामुळे शिवसेनेचा सभापती व उपसभापती होणार हे निश्चित होते. सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने त्यासाठी शिवसेनेचे तीन उमेदवार इच्छुक होते. साकोरे गणातील सुमन निकम, सावरगाव गणातील विद्यादेवी पाटील व न्यायडोंगरी गणाच्या आशा अहेर. उपसभापतीपदासाठी वेहेळगाव गणातील सुभाष कुटे व मांडवडचे भाउसाहेब हिरे यांची नावे घेण्यात येत होती. आज सकाळी शिवसेनेच्या चांडक प्लाझा येथील कार्यालयात जिल्हाप्रमुख सुहास कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, शिवसेना तालुका प्रमुख राजाभाऊ जगताप व बाजार समतिीचे सभापती तेज कवडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात सुमन निकम व सुभाष कुटे यांचे नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
नांदगाव सभापतीपदी सुमन निकम
By admin | Updated: March 14, 2017 17:15 IST