पंचवटी : किरकोळ कारणावरून कुरापत काढून पेठरोडवरील आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहातील तिघा विद्यार्थ्यांना गुरुवारी सायंकाळी दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेतील जखमींना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.याबाबत माहिती अशी की, पेठरोड परिसरात आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह असून, दररोज सायंकाळच्या सुमाराला वसतिगृहाबाहेर गावगुंडांचे टोळके बसलेले असते. या टोळक्यातील काही जण थेट मुलींच्या वसतिगृहात प्रवेश करून विद्यार्थिनींची छेड काढतात तर काही विद्यार्थ्यांना शिवीगाळ करतात. गुरुवारी सायंकाळी जेवण झाल्यानंतर वसतिगृहातील गणेश बांडकुळे, सुनील बहिरम व विवेकानंद कुंवर असे तिघे जण वसतिगृहाबाहेर उभे असताना दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने तिघांना कुरापत काढून मारहाण केली. यात तिघेही जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावगुंडांनी केलेल्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाल्याने सध्या वसतिगृहातील अन्य विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पेठरोड वसतिगृहात फुलेनगर व वसतिगृहालगत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्याच वसाहतीतील गावगुंडांचा मुक्तपणे संचार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याचा गंभीर प्रकार घडल्यानंतर आदिवासी विभागाचे अधिकारी अनभिज्ञ आहेत म्हणूनच की काय ते वसतिगृहाकडे तर फिरकलेच नाही, शिवाय रुग्णालयात दाखल असलेल्या विद्यार्थ्यांचीही चौकशी केली नसल्याने आदिवासी विकास विभागाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
By admin | Updated: October 9, 2015 22:44 IST