किशोर इंदोरकर
मालेगाव कॅम्पमाणसाची ‘आशा’ अत्यंत भाबडी असते. दवाखाना, डॉक्टर सर्व करीत असताना शेवटी त्याला देवावर आणि दैवावरही भरवसा ठेवावाच लागतो असाच काहीसा प्रकार एका मातेच्या बाबत घडला आणि श्रद्धा-अंधश्रद्धेच्या जगात त्या माउलीला पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले.कॅम्प रस्त्यावरील दत्तमंदिरात सकाळच्या प्रहरात नेहमीप्रमाणे भाविकांची गर्दी झाली होती. प्रत्येकजण दर्शन घेऊन मार्गस्थ होत होते. तेवढ्यात गाभाऱ्यात एका महिलेचा हात जळताना दिसला व काही क्षणात ती महिला जागीच कोसळली. तिची ही अवस्था पाहिल्यावर जमलेल्या भाविक महिलांनी तिच्याकडे धाव घेतली. तिच्या जळत्या हातावरील कापूर त्वरित झटकला; परंतु त्या प्रज्वलित कापुरामुळे त्या महिलेच्या हातावर मध्यभागी जखमेचे खड्डे पडले. काही वेळात ती महिला भानावर आल्यावर जोरात रडू लागली. मंदिरातील महिलांनी तिची विचारपूस केली. तिने सांगितले की, माझी दीड महिन्याची चिमुरडी मुलगी जवळच्या हॉस्पिटलमध्ये आजारपणामुळे दाखल आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ती महिला देवाला हार-फूल, नारळ चढवित होती.आज तिने आपल्या मुलीस लवकर बरे वाटावे म्हणून चक्क तळहातावर कापूर जाळून देवाची आणाभाका सुरू केली होती; परंतु हात भाजल्यामुळे तिची काही काळ शुद्ध हरपली. महिलांनी तिच्याकडे धाव घेतल्यावर झालेला प्रकार सर्वांच्या निदर्शनास आला; परंतु अशा करण्यामुळे तिला झालेल्या इजेपेक्षा मुलीला तत्काळ आराम मिळावा हेच तिच्यादृष्टीने अधिक महत्त्वाचे होते. अशीच भावना त्या महिलेने भाविकांजवळ बोलून दाखवली. त्यानंतर सदर महिला आपल्या आजारी लेकीकडे दवाखान्याच्या दिशेने रवाना झाली.