लासलगाव : एका दुर्मीळ पक्ष्याला वाचविण्यात लासलगाव येथील तरुणांना शुक्रवारी सकाळी यश आले. उमेश देसाई व दीपक पवार हे दोघे मित्र सकाळी फिरायला जात असताना एका दुर्मीळ पक्ष्यावर कावळे हल्ला करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या दोघांनीही या जखमी अवस्थेतील पक्ष्याला कावळ्यांच्या तावडीतून सोडवले. या पक्ष्यावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मोटेगावकर यांच्याशी संपर्क साधला. हा दुर्मीळ पक्षी पेंटेड स्नायपार अर्थात रंगीत भेंडलावा या जातीचा असून, कावळ्यांच्या हल्ल्यात त्याच्या मानेखाली जखमा झाल्या आहेत. हा पक्षी मुख्यत्वे नदीकाठच्या दलदल भागात आढळून येतो. त्याच्या अंगावर गर्द पिवळसर रंगाची विशिष्ट नक्षी व पट्टे आहेत. आपल्या खास लांब चोचीने तो गाळातील कीटक व इतर लहान भक्ष पकडून उदरनिर्वाह करतो. शुक्र वारी सकाळी त्याच्यावर केलेल्या उपचारानंतर या पक्ष्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे डॉ. मोटेगावकर यांनी सांगितले. या पक्ष्याला शनिवारी उपचार करून वनसेवक डी. आर. पगारे, एस. जी. पवार यांच्याकडे देण्यात आले. त्यांनी तो पक्षी नांदूरमधमेश्वर येथे सोडणार असल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात विविध जातींचे पक्षी येत आहेत. (वार्ताहर)
दुर्मीळ पक्ष्याला वाचविण्यात यश
By admin | Updated: January 3, 2016 22:39 IST