नाशिक : सिमेंट व स्टीलसह बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमती आणि ग्राहकांना परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून देण्यात बांधकाम व्यावसायिकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना स्वस्त घरे उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने आगामी अर्थसंकल्पात भरीव तरतुदींसह विशेष सवलती अपेक्षित असल्याचे मत क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांनी व्यक्त केले आहे. तसेच शहरांच्या नियोजित विकासासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन नेतृत्व करण्याची गरज असून, यातूनच अनेक नवीन संधी निर्माण करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रेडाई महाराष्ट्रच्या राष्ट्रीय शिखर परिषद २०२१ च्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ३०) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बांधकाम व्यावसायिक शहरांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शहरांचा विकास आणि पायाभूत सुविधांची उभारणी बांधकाम व्यावसायिकांची जबाबदारी असून, त्यासाठी क्रेडाईच्या सभासदांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. विकासाचे काम करत असताना शहर घडवून शहराला ओळख मिळवून देण्याचे कामसुद्धा बांधकाम व्यावसायिक करत असल्याचे मगर यांनी यावेळी सांगितले. यावेळी क्रेडाई राष्ट्रीय सल्लागार जितूभाई ठक्कर, क्रेडाई राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई राष्ट्रीय खजिनदार अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्र अध्यक्ष राजीव पारीख, क्रेडाई महाराष्ट्र सचिव सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिक अध्यक्ष रवी महाजन उपस्थित होते.
..इन्फो
विकासात भूमिका क्रेडाईची महत्त्वाची : महाजन
नाशिक शहरात क्रेडाईची आतापर्यंतची वाटचाल अतिशय विश्वासपूर्ण झालेली आहे. समाजात बांधकाम व्यावसायिकांची प्रतिमा उंचावण्यासोबतच लोकांसोबतचा संवादही सकारात्मकरित्या वाढला आहे. बांधकाम क्षेत्रासोबतच शहर विकासातही क्रेडाई महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष रवी महाजन यांनी यावेळी सांगितले.
(आरफोटो-३० क्रेडाई) -
क्रेडाई महाराष्ट्रच्या राष्ट्रीय शिखर परिषद २०२१ च्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना क्रेडाई राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर. समवेत जितूभाई ठक्कर, शांतीलाल कटारिया, अनंत राजेगावकर, राजीव पारीख, सुनील कोतवाल, रवी महाजन उपस्थित होते.