चांदवड : विद्यापीठ उत्कृष्ट संशोधनाला पेटंट मिळवून देण्यासाठी सक्रिय असून, आर्थिक तरतूद करण्यासाठी अग्रेसर आहे. आविष्कारसाठी निवड झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांनी जर त्यांचे संशोधन सादर केले तर त्यांना अर्थसाहाय्य करण्यास पुणे विद्यापीठ अग्रेसर राहील, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बी.सी.यू.डी. संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी दिली. येथील नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या आबड-लोढा-सुराणा-जैन महाविद्यालयात बी. सी. यू. डी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आविष्कार २०१५ संशोधन महोत्सव संपन्न झाला. यावेळी डॉ. गायकवाड यांनी संशोधनासंदर्भात विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठाची भूमिका समजावून सांगितली. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नेमिनाथ जैन संस्थेच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती होते. विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय मानांकनामध्ये प्रगती केल्याचे सांगितले. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी जास्तीत जास्त पेटंट मिळवावेत. आविष्कारसाठी निवड झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांना विद्यापीठ अधिक गुण देणार असल्याचेही डॉ. गायकवाड यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक संशोधन समन्वयक डॉ. सुरेश पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विद्यापीठ बी. सी. यू. डी.चे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, विश्वस्त व मानद सचिव जवाहरलाल आबड, उपाध्यक्ष अजितकुमार सुराणा, संचालक अरविंद भन्साळी, सुनील चोपडा, नंदकुमार ब्रह्मेचा, प्रकाश बोकडिया, झुंबरलाल भंडारी, महावीर पारख, सुमतीलाल सुराणा, प्रशासकीय अधिकारी पी. पी. गाळणकर, प्राचार्य डॉ. सी. डी. उपासनी, डॉ. रवींद्र जायभावे आदि व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. जी. एच. जैन यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख मांडला. शंभर टक्के प्राध्यापक संशोधन करत आहेत. कम्युनिटी कॉलेज, मराठी विषयासाठी दीर्घ संशोधन प्रकल्प मंजूर झालेले ग्रामीण भागातील चांदवड हे एकमेव महाविद्यालय असल्याचे त्यांनी सांगितले. यात एकूण ३३५ विद्यार्थ्यांनी विज्ञान, कृषी, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र या विषयांमध्ये संशोधन प्रकल्प सादर केले. परीक्षण डॉ. राम गंभीर, भास्कर ठोके, श्रीमती आर. जे. खैरे, डी. बी. काजळे, एन. के. पवार, डी. एम. जाधव, एम. डी. कोकाटे, साहेबराव बागल, सुनील अमृतकर, एस. जे. क्षीरसागर यांनी केले. (वार्ताहर )
पेटंट सादर केल्यास अर्थसाहाय्य
By admin | Updated: October 4, 2015 23:35 IST