नाशिक : विभागीय आयुक्तांनी शिवसेनेसोबत रिपाइंची गटनोंदणी करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर शिवसेनेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी (दि.२७) सुनावणी होऊन शिवसेनेकडून मुंबई व कोकण विभागात यापूर्वी झालेल्या गटनोंदणीचे पुरावे सादर करतानाच स्थायीच्या सर्वच्या सर्व १६ सदस्यांना प्रतिवादी करण्यात आले. यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणी १५जून रोजी घेण्याचे निश्चित केले. त्यामुळे भाजपाला दीड महिन्यासाठी पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. महापालिकेत शिवसेनेचे ३५ सदस्य निवडून आले आहेत. स्थायी समितीवर तौलनिक संख्याबळानुसार चार ऐवजी पाच सदस्य नियुक्त होण्यासाठी सेनेने विभागीय आयुक्तांकडे रिपाइंसह एकत्रित गटनोंदणीचा प्रस्ताव दिला होता. परंतु, शिवसेनेने अगोदरच स्वतंत्र पक्ष म्हणून गटनोंदणी केलेली असल्याने पुन्हा रिपाइंसोबत त्याची पुनरुक्ती करता येत नसल्याचे सांगत विभागीय आयुक्तांनी सेनेचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यामुळे स्थायी समितीवर ८-८ असे बलाबल न होता भाजपाचा बहुमताचा मार्ग मोकळा झाला होता आणि स्थायी समितीच्या सभापतिपदाची निवडणूक होऊन भाजपाचे शिवाजी गांगुर्डे विराजमान झाले आहेत. दरम्यान, विभागीय आयुक्तांच्या या निकालाविरुद्ध शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाने याचिका दाखल करून घेत कोणत्याही निवडप्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला व पुढील सुनावणी २७ एप्रिलला ठेवली होती. याशिवाय, विभागीय आयुक्त व महापालिका आयुक्तांकडूनही त्यांचे स्पष्टीकरण मागविले होते. त्यानुसार, उच्च न्यायालयात न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्यापुढे सुनावणी होऊन न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी शिवसेनेने ठाणे व कोकण विभागात यापूर्वी झालेल्या गटनोंदणीसंबंधीचे दाखले व पुरावे सादर केले. तसेच स्थायी समितीवर झालेली १६ सदस्यांची निवड बेकायदेशीर असल्याचे सांगत सर्वच सदस्यांना प्रतिवादी करण्यात आले. न्यायालयाने आता पुढील सुनावणी १५ जूनला ठेवली आहे. त्यामुळे भाजपाला पुन्हा एकदा दीड महिना दिलासा लाभला आहे. शिवसेनेच्या वतीने अॅड. गोडबोले यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
सेनेकडून गटनोंदणीचे पुरावे सादर
By admin | Updated: April 28, 2017 02:01 IST