नाशिक : एकीकडे आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सलग दुसऱ्या वर्षी स्वेटर मिळण्याबाबत संभ्रम असतानाच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलसारख्या दुर्गम भागात मात्र दान फाउंडेशन व चक्रधर स्वामी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने तब्बल ५०० बालकांना बालदिनाच्या औचित्यावर स्वेटरचे वाटप करण्यात आले.आदिवासी विकासमंत्र्यांनी स्वेटर खरेदी रद्द करून आदिवासी बालकांना कडाक्याच्या थंडीत कुडकुडत राहण्याच्या केलेल्या ‘व्यवस्थेवर’ हरसूलला मात्र स्वयंसेवी संस्थांनी मात करीत विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करून मायेची ‘ऊब’ दिली आहे. पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिनाचे औचित्य साधून नाशिक येथील दान फाउंडेशन आणि चक्रधर स्वामी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने सोमवारी (दि.१४) हरसूल परिसरातील तोरंगण, हरसूल, वायघोळपाडा, सारस्ते, जातेगाव, दलपतपूर, निरगुडे, चिंचवड, सापतपाली, चिखलपाडा, हट्टीपाडा, आदि परिसरातील पहिली ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुमारे ५०० स्वेटरचे वाटप करण्यात आले. आजूबाजूच्या सर्वच खेड्यांवर दान फाउंडेशनच्या वतीने कपड्यांचेही वाटप करण्यात आले. या स्वेटर वाटपप्रसंगी दान फाउंडेशनचे शर्मा काका,नीलेश शर्मा मीना शर्मा, हेमलता शर्मा, विजयकुमार शर्मा, अविनाश देव, ज्ञानेश्वर भुजबळ, विनायक माळेकर, रवींद्र भोये, डॉ. रघुनाथ भोये, पोलीस उपअधीक्षक भोसले, मिथुन राऊत आदिंसह परिसरातील शेकडो नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
खरेदी रद्द तरीही विद्यार्थ्यांना मिळाली मायेची ‘ऊब’
By admin | Updated: November 16, 2016 01:54 IST