नांदगाव : नांदगाव शहर व परिसरात आज दुपारी २ वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाट व विजांच्या कडकडाटांसह पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस सैराट झाल्याचा अनुभव नांदगावकरांनी घेतला. काल रात्री किरकोळ पाऊस झाला. पण दमदार पावसाची गरज होती. ती आजच्या पावसाने पूर्ण केली. शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून, उघडीप दिल्यास येत्या आठवड्यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण होण्याची आशा आहे.सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारी अचानक ढगांनी दाटी केली व पावसास सुरुवात झाली. पावसाचा जोर इतका होता की, काही वेळातच रस्ते जलमय झाले होते. शेतांमध्ये पाणी घुसले. काही ठिकाणी शेतांचे बांध फुटले. पाण्याचे ओहोळ वाहिले. गंगाधरीच्या नाला वाहू लागला. शनिमंदिराजवळील विहिरीला मोठे पाझर लागल्याने ते बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने मोठा शोष आहे. त्यामुळे अजून काही दमदार पावसांची आवश्यकता आहे. तूर्तास आजच्या पावसाने दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)
नांदगावी पावसाची दमदार हजेरी
By admin | Updated: June 30, 2016 00:38 IST