नाशिकरोड : परिसरात शनिवारी पहाटे पुन्हा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचे जोरदार आगमन झाल्याने शेतीमालाचे नुकसान झाले आहे. तसेच जेलरोड दसक स्मशानभूमीजवळ एका झाडाला बांधलेला बैल वीज पडल्याने ठार झाला आहे.नाशिकरोड परिसरात शुक्रवारी सायंकाळी सुमारे अर्धा तास पाऊस झाला. त्यानंतर शनिवारी पहाटे पुन्हा विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचे आगमन झाले. यामुळे रस्त्याच्या कडेला व मोकळ्या जागेत पाण्याची तळी साचली होती. अवकाळी पावसामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही भागात गारांसह झालेल्या पावसामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. जेलरोड दसक स्मशानभूमीजवळ गुजरात राज्यातील फिरस्ते रघुरामा गवळी व आणखी काही कुटुंबे मोकळ्या जागेत झोपड्या टाकून वास्तव्यास आहेत. रघुरामा गवळी यांच्या मालकीचा बैल झोपडीजवळील एका झाडाला बांधलेला होता. सकाळी ७ वाजेच्या सुमारास वीज कोसळल्याने तो बैल जागीच ठार झाला. या पावसामुळे वातावरणात काही काळ गारवा व त्यानंतर पुन्हा उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अशा वातावरणामुळे रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे.
विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचे जोरदार आगमन
By admin | Updated: March 15, 2015 01:27 IST