नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतून वेतन मिळत नसल्याने गुरुवारी (दि.२७) विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक महासंघांच्या वतीने आंदोलन करण्यात आले, तर नाशिक एज्युकेशन संस्थेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी गडकरी चौकात काही वेळ रास्ता रोकोचा प्रयत्न केला. पोलिसांनी आणि जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक महासंघाने विभागीय सहनिबंधकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत होत आहे. परंतु नोटाबंदी झाल्यापासून जवळपास १८ हजार कर्मचाऱ्यांना बॅँकेतून वेतनाचे पाहिजे तेवढे पैसे मिळत नाहीत. शाळा सोडून कर्मचाऱ्यांना तसेच महिलांना दोन-दोन तीन-तीन तास रांगेत उभे राहावे लागते. त्यावेळी जिल्हा बॅँकेचे कार्यकारी संचालक यशवंत शिरसाट यांनी आंदोलनकर्त्यांची जाऊन भेट घेतली. तसेच वेतनाबाबत आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात माध्यमिक शिक्षक महासंघाचे आर. डी. निकम, फिरोज बादशहा, साहेबराव कुटे, शशांक मदाने, के. के. अहिरे, संग्राम करंजकर, शंकर सांगळे, नीलेश ठाकूर, बी. के. सानप आदींसह शेकडो शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
शिक्षकांचा रास्ता रोको
By admin | Updated: April 28, 2017 02:17 IST