सिडको : प्रभागातील विविध समस्यांकडे डोळेझाक करणाऱ्या नगरसेवकाविरोधात आज कामटवाडे शिवारातील अंबिकानगर भागातील महिला व रहिवाशांनी रास्ता रोको आंदोलन करीत निषेध नोंदविला.सिडको प्रभाग क्रमांक ४८ मधून मनसेचे नगरसेवक अनिल मटाले हे निवडून आले आहेत. मटाले हे नगरसेवक झाल्यापासून प्रभागातील अंबिकानगर येथील रहिवाशांनी रस्ता रुंदीकरण करण्याचे तसेच परिसरात पथदीप उभारण्यास सांगूनही मटाले यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप महिला व नागरिकांनी केला. आज सकाळी परिसरातील शेकडो महिला व नागरिकांनी रस्त्यातच ठिय्या आंदोलन केले.प्रभाग क्रमांक ४८ मधील कामटवाडे शिवारातून जाणारा रस्ता हा ४० फुटी असून, या रस्त्यात बाळासाहेब मटाले यांची शेतजमीन आहे. १२ मीटरचा रस्ता हा सध्या फक्त तीनच मीटर असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होऊन अपघात होत आहेत. रस्त्याचे रुंदीकरण तसेच डांबरीकरण करून गैरसोय दूर करावी याबाबतचे निवेदनही नगरसेवक अनिल मटाले यांना दिले आहे. परंतु नगरसेवक मटाले यांनी प्रभागातील कामांकडे दुर्लक्ष केले असून, नवीन वस्तीत सुधारणा केल्या नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अंबिकानगर येथील रस्ता तयार न करता एका राजकीय व्यक्तीने उभारलेल्या इमारतीपर्यंत स्वतंत्र रस्ता तसेच इमारतीच्या आवारात पथदीप उभारल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.दरम्यान, मनपातील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी महिला व नागरिकांची समजूत काढत त्यांचे निवेदन स्वीकारले. तसेच नागरिकांच्या रस्ता तसेच पथदीप बसविणे यांसह विविध समस्यांचे येत्या पंधरा दिवसांत निवारण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.रास्ता रोको आंदोलनप्रसंगी दीपक दातीर, पवन मटाले, शिरीष कुलकर्णी, सुनील धुमाळ, मनीषा साळुंके, सुरेखा वानले, अरुणा पंडित, आशा शिंपी, दीपक साळुंके, डॉ. रवींद्र सोनवणे, सुनीता सोनार, पल्लवी चौधरी, सरला वाघमारे, सुनंदा जाधव, यमुना देशमुख, अशोक भारंबे आदिंसह महिला व नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)