स्वामी सोमेश्वरानंद : रामनामाची अमृतधारा ग्रंथाचा प्रकाशन सोहळात्र्यंबकेश्वर : प्रत्येक नागरिकाने आपल्या घरी झाडे लावून प्रदूषण रोखले पाहिजे, पर्यावरण राखले पाहिजे, असा संदेश श्रीश्री १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती ऊर्फ साहेबान महाराज यांनी दिला. रामनामाची अमृतधारा या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, रंजल्या-गांजलेल्यांची सेवा करा, परोपरकार करा, तुम्हाला मानसिक शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. रामनामाचा जप करा, हनुमानाचा जप करा, तुम्हाला अपयश येणार नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. दरम्यान, ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात चेतन श्री हनुमानमूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा झाला. त्र्यंबकेश्वरपासून ७ ते ८ किलोमीटर अंतरावर बेझे हे तीर्थक्षेत्र आहे. येथे शिलाईमाता या जागृत देवतेचे मंदिर असून, जवळच चक्रतीर्थ (चाकोरे) हे गाव आहे. या ठिकाणी गोदावरी नदी प्रगट झाली आहे. याच गाव परिसरात साहेबान महाराज यांनी आश्रम बांधून श्रीरामशक्ती पीठाची स्थापना केली आहे. महाराजांच्या दर्शनासाठी रोजच नागरिकांची गर्दी असते. परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. या ठिकाणी भक्तांची जणू मांदियाळी भरत असते. या ठिकाणी महाराजांनी नंदनवन तयार केले आहे. महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी पर्यावरणाचा संदेशासह बेटी बचावो- बेटी पढावोचा संदेश दिला तसेच आध्यात्मिकविषयी मार्गदर्शन केले. रामनामाचा जप करा, सेवा करा, सेवेचे फळ मिळाल्यावाचून राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी महंत गणेशानंद सरस्वती, गिरिजानंद सरस्वती, केशवानंद सरस्वती, अखिल भारतीय अखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष शंकरानंद सरस्वती ऊर्फ भगवानबाबा, पर्यावरणावर काम करणारे विजयराज ढमाले यांसह सर्व अखाड्यांचे ठाणापती तसेच ब्रह्मचारी आश्रमातील श्रीनाथानंद सरस्वती, सुदर्शानंद सरस्वती, सिद्धिनाथ सरस्वती, विश्वनाथ सरस्वती आदिंसह सुरेश चव्हाण, राजाराम चव्हाण, रंगनाथ तूपलोंढे, भिका पारधी, रामू चव्हाण आदि ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व भाविकांना फळवाटप करण्यात आले. (वार्ताहर)
पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा!
By admin | Updated: February 27, 2017 01:21 IST