पंचवटी : रस्त्यावर अपघात झाला तर तत्काळ त्याठिकाणी जाऊन कसा अपघात झाला, कधी झाला याची खातरजमा करत अपघाताला कारणीभूत असणाऱ्या आणि नसणाऱ्यांनाही खाकीचा धाक दाखवून वाहनासह संबंधितांना पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात आणतात; मात्र गेल्या दहा ते बारा दिवसांपासून मुंबई-आग्रा महामार्गावरील बळीमंदिराजवळ असलेल्या मुख्य वाहतूक रस्त्यावर बावीस ते चोवीस चाकांचा नादुरुस्त क्रेन आणि तोदेखील भररस्त्यावरच उभा करण्याचा पराक्रम संबंधित क्रेनचालकाने केल्याने वाहतुकीचा खोळंबा तर होतच आहे शिवाय अपघाताचीही दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून मुख्य मार्गावरच उभ्या असलेल्या या क्रेनकडे ना पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे ना वाहतूक शाखेचे लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बळीमंदिरापासून अवघ्या काही अंतरावर उभ्या असलेल्या नादुरुस्त क्रेनमुळे अपघातांची शक्यता असल्याची तक्रार नागरिकांनी तसेच पिंपळगाव टोलनाक्याने पोलीस प्रशासनाकडे करून क्रेन रस्त्यातून हटवावा, असे पोलिसांना कळविले होते; मात्र पोलिसांनी देखील त्याठिकाणी जाऊन केवळ विचारपूस करून सदर क्रेन नादुरुस्त असल्याने तो रस्त्यात थांबविला आहे तसेच तो हलविता येत नाही, असे संबंधितांकडून सांगण्यात आल्याचे कारण पुढे करून गप्प बसून राहण्याची भूमिका बजावली आहे. (वार्ताहर)
नादुरुस्त क्रेनचा महामार्गावरच थांबा
By admin | Updated: July 9, 2016 00:49 IST