घोटी : इगतपुरी तालुक्यातील तळोघ येथून चार दिवसांपूर्वी चोरीला गेलेली दुचाकी शेनवड बु।। येथील लघुपाटबंधाऱ्यात मिळून आली आहे. दरम्यान आज सकाळी काही शाळकरी मुलांनी धरणाच्या पाण्यात लाल रंगाची दुचाकी असल्याची बाब पोलीसपाटील दत्तू कोकाटे यांना सांगितली. त्यांनी तातडीने या प्रकारची माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांनी सदर दुचाकी पाण्याबाहेर काढली असता सदरची दुचाकी चार दिवसापासून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले आहे.घोटीपासून जवळच असलेल्या शेनवड बु।।च्या लघु पाटबंधाऱ्याच्या पात्रात एक लाल रंगाची दुचाकी पाण्यात पूर्णपणे बुडाली असल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या शाळकरी मुलांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत पोलीसपाटील दत्तू कोकाटे यांना कळविले. दरम्यान काल वर्षाचा अखेरचा दिवस असल्याने कोणी मद्यपी तोल गेल्याने थेट धरणात गेला की, घातपात करण्याच्या उद्देशाने ही दुचाकी पाण्यात टाकली असा संशय बळावला. मात्र याबाबतची कल्पना तत्काळ पोलिसांना दिल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक शेळके, दिवटे यांनी घटनास्थळी येऊन स्थानिक युवकांच्या मदतीने दुचाकी पाण्याबाहेर काढली. या दुचाकीच्या क्रमांकावरून सदरची दुचाकी तळोघ येथील एका युवकाची असून, दुचाकी चार दिवसांपूर्वी चोरीला गेल्याची बाब स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर दुचाकी मालकाच्या ताब्यात देण्यात आली. (वार्ताहर)
चोरीला गेलेली दुचाकी मिळाली धरणात
By admin | Updated: January 2, 2015 00:26 IST