येवला : ऐन दिवाळीपूर्वी चोरट्यांनी कुलूपबंद घरांवर डल्ला मारण्यास सुरुवात केली असून, गुरुवारी मध्यरात्री शहरातील दोन घरांसह एका परमिटरूम बिअरबारमध्ये चोऱ्या करीत लाखांचा माल लंपास केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरातील पारेगाव रस्त्यावरील बाजीरावनगर भागातील पत्रकार संतोष विंचू यांच्या घराला कुलूप असताना चोरट्यांनी दर्शनी दरवाजाचा कोयंडा तोडत घरात प्रवेश केला. घरातील एलजी कंपनीचा एलसीडी मॉनिटर व सीपीयू, सॅमसंग कंपनीचा एलसीडी टीव्ही, होमथिएटर, २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने, रोख ५ हजार रुपये, १० हजार रु पये किमतीचे नवे कपडे असा एकूण सुमारे ७० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. संतोष विंचू यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून ठसे तज्ज्ञांना पाचारण करीत ठसे घेतले आहेत. चोरट्यांनी घरातील इतर ऐवजही चोरून नेला असून, कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिल्याचे आढळून आले. (वार्ताहर)मोरे वस्तीवर चोरीचोरट्यांनी पारेगाव रस्त्यावरील मोरे वस्ती येथील नामदेव शेजवळ यांच्या घराला कुलूप असताना घराचा कोयंडा तोडत याच पध्दतीने चोरी केली. शेजवळ यांच्या घरातील दीड तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, १ तोळा वजनाचे सोन्याचे कानातील रिंग्ज, अर्धा तोळा वजनाची गळ्यातील सोन्याची साखळी, एक तोळा वजनाचे कानातील सोन्याचे दागिने असे एकूण चार तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले.विक्र ांती हॉटेलमधील लॅपटॉप लंपासएस.टी. बस स्टॅण्डलगत असलेल्या विक्र ांती हॉटेलमध्येही चोरट्यांनी शटरचे कुलूप व खिडकीची जाळी तोडून हॉटेलमधील लॅपटॉप व रोख चार हजार रु पये रकमेसह दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. शहर पोलीस ठाण्यात विकर्णसिंह परदेशी यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्याच आठवड्यात पारेगाव रस्त्यावरील महात्मा फुले नगरातील आव्हाड हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत आव्हाड यांच्या घरात भरदिवसा चोरट्यांनी प्रवेश करत ९ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख अडीच लाख रु पये रकमेची चोरी केली होती. या चोरीचा तपास अद्याप लागलेला नसताना पुन्हा एकाच रात्रीत चोरट्यांनी तीन ठिकाणी चोऱ्या करीत पोलीस यंत्रणेसमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे.
येवल्यात एकाच रात्री तीन ठिकाणी चोऱ्या
By admin | Published: November 06, 2015 11:15 PM