नितीन बोरसे सटाणाबागलाण हा तसा पूर्वी नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला समृद्ध परिसर होता. या जंगल संपदेमुळे वन्यजीवांचादेखील या भागात मोठ्या प्रमाणात वावर असल्यामुळे हिवाळ्यात अन्नाच्या शोधार्थ स्थलांतरित होत असलेल्या परदेशी प्रवासी पक्ष्यांचेदेखील आगमन होत होते; मात्र कालांतराने बेसुमार वृक्षतोडीमुळे या परिसरात वास्तव्यास असलेल्या वन्यजीवांनीच अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केल्यामुळे या उजाड माळरानाकडे परदेशी पाहुण्यांनीदेखील पाठ फिरविली होती. वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेले पावसाचे प्रमाण, अवकाळी पावसाचे वाढते प्रमाण, गारपीट, वाढते तपमान या नैसर्गिक बदलामुळे सर्वांना वनसंपदेचे महत्त्व कळू लागले आहे. त्यात वनविभागाकडून जंगल संवर्धनासाठी वेळोवेळी केली जाणारी जनजागृती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन काटवन भागातील दरेगाव, नांदीन, पिसोळ या तिन्ही गावांच्या ग्रामस्थांनी चराई बंदी, कुऱ्हाडबंदी करून लोकसहभागातून वनसंवर्धनाचे यशस्वी काम केले आहे. हा परिसर आता वनसंपदेने फुलला आहे. या जंगलात हरीण, बिबळे, लांडगे, कोल्हे, मोर या वन्यजीवांचा वावर वाढला असताना यंदा परदेशी प्रवासी पक्ष्यांचाही चिवचिवाट ऐकायला येत आहे. या भागात परदेशी पक्ष्यांचा मुक्काम पक्षिमित्रांसाठी कुतूहल आणि संशोधनाचा विषय असला तरी याला जंगल संवर्धन हेच कारण असल्याचे पर्यावरण प्रेमींनी सांगितले. या जंगलात यंदा दुर्मीळ सहा प्रकारच्या निरनिराळ्या परदेशी पक्ष्यांनी मुक्काम ठोकला आहे. या पक्ष्यांमध्ये तांबुळा, वटवट्या, नाचणी, न्हावी, रान खाटिक, गांधारी, छोटा "खाटिक, कालशीर्ष भारिट यांचा समावेश आहे. या थंड प्रदेशातील प्रवासी पक्ष्यांनी अन्नाच्या शोधार्थ या भागात मुक्काम ठोकला असल्याचे पक्षिमित्र सुमित अहिरे यांना निरीक्षणात आढळून आले आहे.
काटवनच्या जंगलात परदेशी पक्ष्यांचा मुक्काम
By admin | Updated: January 31, 2016 22:08 IST