नाशिकरोड : परिसरामध्ये मनपा प्रशासनाकडून अनधिकृत कच्चे-पक्के बांधकाम, पत्र्याचे शेड आदि अतिक्रमणावर मार्किंग करण्यात आल्यानंतर अनेक अतिक्रमणधारकांनी नुकसान व कारवाईच्या भीतीपोटी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली आहे.दीड-दोन आठवड्यांपूर्वी मनपा अतिक्रमण विरोधी पथकाकडून गंगापूररोड व इतर ठिकाणी कठोर कारवाई करून सर्वांचेच अतिक्रमण जमीनदोस्त केले होते. त्यानंतर जेलरोड संत जनार्दन पुलापासून जेलरोडला दुतर्फा बिटको ते शिवाजी पुतळा, महात्मा गांधीरोड, सुभाषरोड, शाहू महाराज पथ, आंबेडकर रोड, देवी चौक आदि ठिकाणचे अतिक्रमण व वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर मार्किंग करण्यात आले होते. त्यानंतर अतिक्रमणधारकांनी नुकसान व कारवाईचा धसका घेत गेल्या काही दिवसांपासून स्वत:हून आपले अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली आहे. दुकानांपुढील ओटे, वाढीव बांधकाम, पत्र्याचे शेड, लोखंडी जाळी, टपऱ्या, दुकाने आदि अतिक्रमणधारक स्वत:हून काढून घेत आहे. मनपा आयुक्तांनी आठ दिवस अतिक्रमण मोहीम होणार नसल्याचे गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते. त्या काळात मनपा प्रशासनाकडून अतिक्रमणावर मार्किंग करण्यात आले. त्यामुळे पुढील आठवड्यात सोमवारपासून कधीही अतिक्रमण विरोधी कारवाईला सुरुवात होऊ शकते या भीतीपोटी अनेकजण अतिक्रमण काढून घेताना दिसत आहे.
स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे काढून घेण्यास प्र्रारंभ
By admin | Updated: January 17, 2015 00:00 IST