ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १४ - तब्बल १२ वर्षांनी गोदावरीतीरी सिंहस्थ कुंभपर्वास सुरूवात झाली आहे. सकाळी ६ वाजून १६ मिनिटांच्या मुहुर्तावर गुरू व रवी यांचा सिंह राशीत प्रवेश झाला आणि कुंभमेळ्याचा शुभारंभ झाला. त्यानंतर रामकुंड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजन ध्वजारोहण करण्यात आले, त्यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजनही उपस्थि होते. तर त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्तावर केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर कुंभमेळ्याला अधिकृतपणे सुरूवात झाल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी दोन्ही ठिकाणचे घाट साधू, महंत, भाव-भाविकांनी फुलून गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भाविकांना कुंभमेळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.
गेल्या दोन वर्षांपासून नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याच्या आयोजनाची जय्यत तयारी सुरू होती. दरम्यानकुंभमेळ्यानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी शहरात विशेष बंदोबस्त तैनात केला असून घाटाकडे येणा-या रस्त्यांवरही कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
दृष्टिक्षेपात सिंहस्थ..
- 2,378 कोटींचा विकास आराखडा
- 15कोटी रुपये ब्रँडिंगसाठी
- 22 हजार पोलिसांचा फौजफाटा
- 14 वाहनतळांची निर्मिती
- 36 विशेष गाड्या मध्य रेल्वे सोडणार
- भाविकांसाठी निवाराशेड व ‘कम्युनिटी किचन’
- रिंगरोड निर्मिती, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण